उन्हाळ्याच्या दिवसांत कारमधून प्रवास करताना AC सुरू ठेवणं अनेकांसाठी गरजेचं असतं. बाहेर कितीही उकाडा असला तरी गाडीच्या आत थंडावा मिळावा यासाठी आपण सतत AC वापरतो. पण कारचा AC सुरू ठेवल्यामुळे पेट्रोल किंवा डिझेल जास्त खर्च होतं, हे तुम्हाला माहीत आहे का?
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, कारचा AC एका तासात साधारण ०.२ ते ०.८ लिटरपर्यंत इंधन खर्च करू शकतो. एवढंच नाही तर AC सतत सुरू ठेवल्यामुळे गाडीच्या एकूण इंधन वापरात ८ ते १० टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकतं. त्यामुळे गाडी थंड ठेवण्यासोबतच त्यासाठी जास्त इंधनही खर्च होतं.
कारचा AC हा गाडीच्या इंजिनशी जोडलेला असतो. AC मधील कंप्रेसर इंजिनच्या ताकदीवर चालतो. त्यामुळे AC सुरू केल्यानंतर इंजिनला जास्त काम करावं लागतं. इंजिनवर हा अतिरिक्त ताण आल्यामुळे पेट्रोल किंवा डिझेलचा वापर वाढतो.
सामान्य हवामानात आणि नेहमीच्या परिस्थितीत कारचा AC एका तासाला साधारण ०.२ ते ०.४ लिटर अतिरिक्त इंधन खर्च करू शकतो. पण हा खर्च प्रत्येक गाडीत सारखा नसतो. गाडीचं इंजिन, बाहेरचं तापमान आणि AC किती थंड ठेवला आहे यावर इंधनाचा खर्च ठरतो. बाहेर खूप उकाडा असेल तर गाडीच्या आतील भागात थंडावा निर्माण करण्यासाठी AC ला जास्त काम करावं लागतं.
छोटी कार आणि मोठी SUV यांच्या AC मुळे होणाऱ्या इंधन खर्चात फरक असतो. हॅचबॅक कारचा आकार लहान असल्यामुळे तिच्या आतील भागात थंडावा निर्माण करण्यासाठी कमी ऊर्जा लागते. त्यामुळे अशा कारमध्ये AC मुळे एका तासाला साधारण ०.२ लिटर अतिरिक्त इंधन खर्च होऊ शकतं. दुसरीकडे SUV चा आतील भाग मोठा असतो. तसंच त्यामध्ये जास्त क्षमतेचा कंप्रेसर असू शकतो. त्यामुळे मोठ्या SUV मध्ये AC मुळे एका तासाला ०.८ लिटरपर्यंत इंधन खर्च होऊ शकतं.
गाडीमध्ये नियमितपणे AC वापरल्यास तिच्या मायलेजवर परिणाम होतो. तज्ज्ञांच्या मते लांबच्या प्रवासात सतत AC सुरू ठेवल्यामुळे गाडीच्या इंधनाचा वापर ८ ते १० टक्क्यांपर्यंत वाढू शकतो.
अनेक जण पार्किंगमध्ये किंवा कोणाची वाट पाहताना गाडी सुरू ठेवून AC चा वापर करतात. परंतु इंधन वाचवण्याच्या दृष्टीने ही सवय योग्य नाही. कारण गाडी एकाच जागी उभी असतानाही इंजिन सुरू असल्यामुळे पेट्रोल किंवा डिझेल खर्च होत राहतं. पण या काळात गाडी एकही किलोमीटर पुढे जात नाही. म्हणजेच इंधन खर्च होतं पण त्यातून कोणतंही अंतर पार होत नाही.
AC बंद करून खिडक्या उघडल्या की इंधनाची बचत होते असा अनेकांना समज असतो. पण हायवेवर वेगाने गाडी चालवताना हा उपाय नेहमीच फायदेशीर ठरत नाही. साधारण ८० किलोमीटर प्रतितास किंवा त्यापेक्षा जास्त वेगाने गाडी चालवत असताना खिडक्या उघड्या ठेवल्यास बाहेरची हवा गाडीला जास्त अडथळा ठरते. त्यामुळे इंजिनवर अधिक ताण येतो. अशा वेळी खिडक्या उघड्या ठेवण्यापेक्षा AC सुरू ठेवणं काही वेळा अधिक फायदेशीर ठरू शकतं.
कारच्या AC ची नियमित काळजी घेणंही महत्त्वाचं आहे. AC ची योग्य देखभाल न केल्यास त्याच्या कंप्रेसरला जास्त मेहनत करावी लागते. यामुळे इंधनाचा वापर वाढू शकतो. त्यामुळे वेळोवेळी केबिन एअर फिल्टर बदलून घ्यावा. त्याचप्रमाणे AC मध्ये वापरल्या जाणाऱ्या रेफ्रिजरंट गॅसचीही तपासणी करून घ्यावी. AC ची योग्य देखभाल केल्यास गाडी लवकर थंड होते आणि इंजिनवरचा अतिरिक्त ताण कमी होण्यास मदत होते.