रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा सण आहे.
राखी किमान 24 तास तरी ठेवावी.
राखी श्रावण पौर्णिमेपासून भाद्रपद अमावास्येपर्यंत ठेवता येते.
रक्षाबंधन हा सण भाऊ बहिणींच्या नात्यातील प्रेम, जिव्हाळा, श्रद्धा आणि आजीवन संरक्षणाच्या वचनाचे प्रतीक मानला जातो. हा सण दरवर्षी श्रावणातील पौर्णिमेला साजरा केला जातो. यंदा रक्षाबंधन आज म्हणजेच शनिवारी ९ ऑगस्ट २०२५ रोजी आहे. या दिवशी बहिण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते. राखी बांधून बहिण भावाकडून आयुष्यभर आपल्या रक्षणाचे वचन मागते आणि त्याच्या दीर्घायुष्य, सुख-समृद्धी व यशासाठी प्रार्थना करते.
रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने भावाच्या हातात बांधलेली राखी हा फक्त धागा नसतो तर तो त्यांच्या नात्यातील प्रेम, विश्वास आणि आदराचे प्रतीक असतो. हा सण मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने साजरा केला जातो. मात्र राखी कधी आणि कशी उतरवायची याकडे अनेकदा लोक दुर्लक्ष करतात.
काहीजण राखी काढून कुठेही फेकून देतात पण हा योग्य मार्ग नाही. म्हणूनच राखी किती दिवस ठेवावी आणि उतरवल्यानंतर काय करावं, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
राखी हातात किती दिवस ठेवायची हे पूर्णपणे व्यक्तीच्या श्रद्धा, सोय आणि विश्वासावर अवलंबून असते. धार्मिक दृष्टिकोनातून राखी उतरण्यासाठी ठराविक दिवस नाही परंतु श्रावण पौर्णिमेपासून भाद्रपद अमावास्येपर्यंत राखी ठेवणं योग्य मानलं जातं.
काही मान्यतानुसार राखी ३, ७ किंवा ११ दिवस ठेवून उतरवली जाते. अनेक जण जन्माष्टमी किंवा गणेश चतुर्थीच्या दिवशीही राखी काढतात. पण किमान २४ तास तरी राखी हातात ठेवावी, त्याआधी काढू नये. त्याचप्रमाणे पितृपक्ष सुरू होण्यापूर्वी राखी नक्की उतरवावी.
विज्ञानाच्या दृष्टीनेही राखी खूप दिवस हातात ठेवणं योग्य मानलं जात नाही. राखी साधारणपणे सूती किंवा रेशमी धाग्याची बनलेली असते. ती पाणी किंवा धूळ-मातीच्या संपर्कात आल्याने घाण होते, ज्यामुळे बॅक्टेरियाचा धोका वाढू शकतो. म्हणून राखी स्वच्छ आणि चांगल्या स्थितीत असेपर्यंतच हातात ठेवणे हितावह असते.
राखी हा एक पवित्र धागा असल्याने ती कधीही कचर्यात टाकू नये. राखी उतरवल्यानंतर ती पाण्यात विसर्जित करावी, एखाद्या झाडाच्या फांदीला बांधावी किंवा झाडाच्या मुळाशी पुरून ठेवावी. विसर्जन शक्य नसल्यास झाडाला बांधणं हा उत्तम पर्याय आहे. अशा प्रकारे राखीला योग्य सन्मान देत तिचा निरोप द्यावा.
रक्षाबंधन 2025 च्या वर्षी केव्हा साजरा केला जात आहे?
रक्षाबंधन 2025 मध्ये 9 ऑगस्ट रोजी, शनिवारी साजरा केला जात आहे.
राखी किती दिवस हातात ठेवावी?
राखी किमान 24 तास तरी हातात ठेवावी. काहीजण 3, 7 किंवा 11 दिवस ठेवतात. भाद्रपद अमावास्येपर्यंतही ठेवतात, पण पितृपक्षापूर्वी नक्की उतरवावी.
राखी उतरवल्यानंतर तिचे काय करावे?
राखी पवित्र मानली जाते, म्हणून ती कचऱ्यात टाकू नये. तिचे पाण्यात विसर्जन करावे किंवा झाडाला बांधावी किंवा मुळाशी पुरून ठेवावी.
वैज्ञानिक दृष्टिकोनातून राखी का लवकर काढावी?
राखी सूती किंवा रेशमी असते. पाणी, धूळ लागल्याने ती घाणीची होते आणि बॅक्टेरियाचा धोका निर्माण होऊ शकतो, म्हणून लवकर काढणे आरोग्यासाठी चांगले.
राखीचे प्रतीकात्मक महत्त्व काय आहे?
राखी हा फक्त धागा नसून, भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, विश्वास, आदर आणि संरक्षणाचे प्रतीक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.