एप्रिलचा महिना सुरु असून मे महिन्यात उकाडा वाढणार आहे. दुपारची उकाड्याची सवय आपल्याला असतेच, पण यंदा परिस्थिती थोडी वेगळीच दिसतेय. आधी दुपारीही खेळायला आरामदायक वाटणारी शाळेची मैदानं आता सकाळीच तापलेली जाणवत आहेत. या बदलत्या उष्णतेचा सर्वाधिक परिणाम होत आहे तो लहान मुलांवर.
लहान मुलांचं शरीर अजून वाढीच्या टप्प्यात असल्यामुळे त्यांना इतक्या तीव्र तापमानाचा सामना करणं कठीण जातं. त्यामुळे त्यांच्या शरीरात आणि वागण्यात होणारे बदल वेळेवर ओळखणं खूप गरजेचं ठरतं. हे बदल लक्षात घेतले तर पालकांना मुलांच्या आरोग्याची काळजी घेणं अधिक सोपं होऊ शकतं.
नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटलच्या कन्सल्टंट पीडियाट्रिक गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि हेपॅटोलॉजी तज्ज्ञ डॉ. आदित्य सतीश कुलकर्णी यांच्या मते, उष्णतेमुळे होणाऱ्या डिहायड्रेशनचा परिणाम फक्त त्वचेवर किंवा उर्जेवरच होत नाही तर तो थेट पचनसंस्थेवरही होतो. त्यामुळे मुलांना बद्धकोष्ठता, भूक न लागणं किंवा पोटदुखी यांसारख्या तक्रारी जाणवू शकतात.
याशिवाय, मुलांच्या वागण्यातही बदल दिसू शकतो. काही मुलं खाणं टाळतात, कमी एक्टिव्ह होतात किंवा अगदी पटकन चिडचिड करू लागतात. हे सगळे संकेत शरीरावर उष्णतेचा ताण येत असल्याचं दर्शवतात. ज्या मुलांना आधीपासून दमा किंवा ॲसिड रिफ्लक्ससारख्या समस्या आहेत, त्यांच्यासाठी ही परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. उष्णता आणि डिहाड्रेशनमुळे त्यांची लक्षणं वाढू शकतात.
तज्ज्ञांच्या मते, काही साध्या सवयी अंगीकारल्या तर मुलांना उष्णतेपासून बर्याच अंशी सुरक्षित ठेवता येऊ शकतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलांना वेळोवेळी पाणी पाजणं, त्यांना तहान लागेपर्यंत थांबू न देता नियमित पाणी देणं गरजेचं आहे. तसंच, हलके आणि हवा खेळती राहील असे सुती किंवा लिननचे कपडे घालणंही तितकंच महत्त्वाचं आहे.
सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत उन्हाचा तडाखा जास्त असतो. त्यामुळे या काळात मुलांना बाहेर खेळू देणं टाळावं आणि घरातील खेळांकडे त्यांना वळवावं. जर मुलं बाहेर खेळत असतील, तर त्यांना सावली मिळेल आणि पाण्याची सोय असेल याची खात्री करणं आवश्यक आहे.
मुलांमध्ये थकवा जाणवणं, ओठ कोरडे पडणं किंवा लघवी कमी होणं ही डिहायड्रेशनची लक्षणं असू शकतात. अशा संकेतांकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर हवामानातील बदलांशी जुळवून घेण्यासाठी मुलांना हळूहळू तयार करणंही तितकंच महत्त्वाचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.