तुमचं वय अवघं 30 वर्षं आहे आणि तुम्ही स्वतःला पूर्णपणे फीट समजत असाल तरीही तुम्हाला उच्च रक्तदाब म्हणजेच हाय ब्लड प्रेशरचा त्रास असू शकतो. सध्या 30 वर्षांच्या आसपासच्या अनेक लोकांमध्ये हाय BP त्रास पाहायला मिळतोय. यातील अनेकांना कोणतीही लक्षणं जाणवत नाहीत. त्यामुळे नेहमीच्या आरोग्य तपासणीवेळीच त्यांचा रक्तदाब वाढलेला असल्याचं समोर येतं.
गुरुग्राम इथले मेदांता रुग्णालयाच्या कार्डिओलॉजी विभागाचे संचालक डॉ. गगनदीप एस यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या मते, उच्च रक्तदाबाची सर्वात मोठी अडचण म्हणजे हा आजार अनेकदा कोणतीही स्पष्ट लक्षणं दाखवत नाही.
हाय BP असताना अनेकदा छातीत दुखत नाही किंवा धापही लागत नाही. त्यामुळे व्यक्तीला आपण पूर्णपणे ठीक असल्याचं वाटत राहतं. मात्र त्याच वेळी वाढलेला रक्तदाब शरीरातील रक्तवाहिन्यांवर हळूहळू परिणाम करत असतो.
आपण दिवसभर नेहमीप्रमाणे काम करत असतो पण दुसरीकडे प्रत्येक ठोक्यासोबत हृदयावर जास्त ताण येत असतो. रक्तवाहिन्यांची लवचिकताही हळूहळू कमी होत जाते. त्यामुळे उच्च रक्तदाबाला 'सायलेंट किलर' म्हणजेच शांतपणे शरीराला नुकसान करणारा आजार म्हटलं जातं.
डॉ. गगनदीप यांनी सांगितलं की, आता 30 वर्षांच्या आसपासच्या लोकांमध्येही हाय BPची अनेक प्रकरणं पाहायला मिळतात. या व्यक्ती दिसायला फिट असतात आणि रोजच्या आयुष्यातही एक्टिव्ह असतात. मात्र नेहमीच्या तपासणीत त्यांचा रक्तदाब वाढलेला आढळतो.
काही रुग्णांचा रक्तदाब औषधांच्या मदतीने नियंत्रणात ठेवला जातो. कमी वयात हाय BP होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. खराब जीवनशैली, कामाचे जास्त तास, सतत वाढलेला स्क्रीन टाइम, झोपेची बिघडलेली वेळ, आहारातील जास्त मीठ आणि प्रोसेस्ड फूडचं जास्त सेवन यामुळेही रक्तदाब वाढण्याचा धोका असतो.
रक्तदाब वाढण्याची प्रक्रिया अनेकदा हळूहळू होते. काही महिने किंवा वर्षभरात BP वाढत जातो. त्यामुळे सुरुवातीला त्याची कोणतीही जाणीव होत नाही. पण आतून त्याचा शरीरावर परिणाम सुरू असतो. वाढलेल्या रक्तदाबामुळे हृदयाला प्रत्येक वेळी रक्त पंप करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते. याकडे वेळेत लक्ष दिलं नाही तर पुढे हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि किडनीचं नुकसान होण्याचा धोका वाढू शकतो.
'BP तपासण्याची गरज फक्त 50 वर्षांनंतरच असते' असा विचार करणं योग्य नाही. वय 30 वर्षं असलं तरी रक्तदाबाची नियमित तपासणी करणं महत्त्वाचं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, 30 वर्षांच्या व्यक्तींनी वर्षातून किमान 5 ते 10 वेळा रक्तदाब तपासून घ्यावा. रक्तदाब तपासण्यासाठी काही मिनिटांचाच वेळ लागतो. त्यामुळे कोणतीही समस्या सुरुवातीच्या टप्प्यात लक्षात येण्यास मदत होऊ शकते.
मात्र एकदा BP वाढलेला आला म्हणून लगेच हाय BPचा आजार आहे असं समजू नये. त्याऐवजी काही काळातील रक्तदाबाच्या रीडिंगकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. काही आठवडे सातत्याने रक्तदाबाची रीडिंग जास्त येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
उच्च रक्तदाबाचा धोका कमी करण्यासाठी रोजच्या जीवनशैलीत काही बदल करणं महत्त्वाचं आहे.
आहाराकडे विशेष लक्ष द्या.
जास्त मीठ आणि फास्ट फूड खाणं टाळा.
दररोज चालण्याची सवय लावा.
दिवसाला किमान 2 ते 3 हजार पावलं चालण्याचा प्रयत्न करा.
दररोज 6 ते 8 तासांची झोप घ्या.
मानसिक ताण कमी करण्याचा प्रयत्न करा आणि स्ट्रेस व्यवस्थित हाताळा.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.