ऑफिस आणि घर सांभाळण्यासाठी वर्किंग वूमनला तारेवरची कसरत करावी लागते. घरातील प्रत्येक गोष्ट मॅनेज करुन ऑफिसमधील कामही करावे लागते. अशात जर घरात लहान मुलं असतील, तर त्यांच्या टिफिनचेही पाहावे लागते. अशावेळी मुलांना टिफिनमध्ये काय द्यावं? असा प्रश्न महिलांना पडतोच. मुलांना दररोज नवनवीन पदार्थ दिल्यास त्यांना बाहेरील पदार्थ खाण्याची सवय लागत नाही. हाच प्रश्न मिटवण्यसाठी तुम्हाला घरच्या घरी अप्पे तयार करण्याची रेसिपी सांगणार आहोत.
अप्पे तयार करण्याची रेसिपी अगदी सोपी आहे. त्यामुळे मुलांच्या टिफिनला देण्यासाठी हा एक चांगला पर्याय ठरु शकतो. इतकेच काय तर घरी नाश्त्यालाही याचा वापर करु शकता. स्वादिष्ट असणारे अप्पे दक्षिण भारतीय असले तरी महाराष्ट्रात सुद्धा चवीने खाल्ली जातात.
साहित्य
२ कप तांदूळ
१ /४ कप मूग डाळ
१ /४ कप उडीद डाळ
१ /४ कप तूर डाळ
१ /४ कप मसूर डाळ
१ /४ कप चणाडाळ
बारीक चिरलेला कांदा
मक्याचे दाणे
हिरव्या मिरच्या
बारीक चिरलेली कोथिंबीर
मीठ
बनवण्याची पद्धत
सर्व प्रथम सर्व डाळी साफ करुन स्वच्छ धुवून घ्या. नंतर स्वच्छ धुतलेल्या सर्व डाळींना एकत्र करुन ४ ते ५ तास पाण्यात भिजवून ठेवा. भिजलेल्या सर्व डाळींना मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक वाटून घ्या. बारीक वाटून झाल्यावर त्या बॅटरला एका भांड्यात काढून रात्रभर फुगण्यासाठी ठेवा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी त्या बॅटरला चांगले चमच्याने फिरवून घ्या. यानंतर त्या बॅटरमध्ये बारीक चिरलेला कांदा, मक्याचे दाणे, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर आणि मीठ अॅड करा. नंतर अॅड केलेले सर्व मिश्रण चांगले मिक्स करुन घ्या.
पुढच्या स्टेपमध्ये गॅस ऑन करुन त्यावर अप्पे पात्र म्हणजे [अप्प्याच्या भांड्याला] तेल लावून ठेवा. नंतर चमच्याच्या साहाय्याने त्या भांड्यात अप्पाचे एक-एक बॅटर टाका. त्यानंतर झाकण ठेवून अप्पयांना दोन्ही बाजूंनी नीट शेकून घ्या. अशा पद्धतीने सर्व अप्पे तयार करुन घ्या. आपले गरमागरम आणि पौष्टिक अप्पे तयार झाले आहेत. तयार झालेल्या अप्प्यांना तुम्ही हिरव्या चटणी सोबत सर्व्ह करु शकता.
अप्पे हे शरीरासाठी आरोग्यदायी असून त्यात कमी कॅलरीज आणि अनेक जीवनसत्वे असतात. त्याचबरोबर ते आपल्या शरीराच्या पचनक्रियेसाठी हलके असल्याने आपल्या शरीराचे योग्यरित्या कार्य करण्यास मदत करत असतात. अप्प्यांमध्ये प्रामुख्याने डाळीचा समावेश असतो. यामुळे आपल्या शरीराला अनेक फायदे मिळत असतात. अप्पे हा शरीरासाठी एक उत्तम हेल्दी आहार आहे.