फॅटी लिव्हर हा आज केवळ जास्त मद्यपान करणाऱ्या लोकांनाच होतो असं नाही. आज अनेक असे पुरुष आहेत जे फारसे मद्यपान करत नाहीत तरीही त्यांना फॅटी लिव्हरचा त्रास होतो. यामागे बदलती जीवनशैली हे सर्वात मोठं कारण आहे. दिवसभर बसून काम करणं, सतत बाहेरचं किंवा प्रक्रिया केलेलं अन्न खाणं, वाढतं वजन, मधुमेह, ताणतणाव आणि व्यायामाचा अभाव या सगळ्या गोष्टी मिळून हा आजार वाढवतायत.
फॅटी लिव्हर म्हणजे यकृताच्या पेशींमध्ये गरजेपेक्षा जास्त चरबी साचणं. सुरुवातीच्या टप्प्यात या आजाराची कोणतीही ठळक लक्षणं दिसून येत नाहीत. त्यामुळे अनेकांना हा त्रास आहे याची कल्पनाच नसते. अनेकदा इतर कारणांसाठी तपासणी करताना फॅटी लिव्हर असल्याचं समोर येतं.
नवी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमधील सल्लागार, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, हेपॅटोलॉजी, इंटरव्हेंशनल एंडोस्कोपी, यकृत प्रत्यारोपण याचे तज्ज्ञ डॉ. दीपक भंगाळे यांनी सांगितलं की, पुरुषांच्या दैनंदिन सवयी आणि कामाचं स्वरूप यामुळे त्यांच्यात फॅटी लिव्हरचा धोका तुलनेने जास्त असतो. कामाच्या व्यापामुळे जेवणाच्या वेळा अनियमित होतात. बाहेरचे, तेलकट आणि प्रक्रिया केलेले अन्न खाण्याचं प्रमाण वाढतं. काहीजण नियमित मद्यपान करतात पुरेशी झोप घेत नाहीत आणि सतत तणावाखाली असतात. याशिवाय पोटाभोवती बेली फॅट हे देखील फॅटी लिव्हरचं महत्त्वाचं कारण आहे.
फॅटी लिव्हर हा केवळ यकृतापुरता मर्यादित आजार नाहीये. तो शरीरातील इतर अनेक गंभीर आजारांशी संबंधित असतो. लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि वाढलेलं कोलेस्ट्रॉल या समस्या असलेल्या व्यक्तींमध्ये फॅटी लिव्हरची शक्यता जास्त असते. तसंच फॅटी लिव्हर असलेल्या व्यक्तींना हार्ट अटॅकचा धोकाही वाढू शकतो.
या आजाराचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तो सुरुवातीलाच ओळखला गेला तर जीवनशैलीत योग्य बदल करून तो बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात आणता येतो. मात्र दुर्लक्ष केल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते. लिव्हर सिरोसिस होणं आणि पुढे काही रुग्णांमध्ये लिव्हर कॅन्सरसारखे गंभीर आजारही उद्भवू शकतात.
फॅटी लिव्हर असलेल्या काही व्यक्तींना सतत थकवा जाणवतो. शरीरात ऊर्जा कमी वाटणं किंवा पोटात अस्वस्थपणा जाणवणं अशी लक्षणं सुरुवातीला दिसून येतात. त्याचसोबत काहींना वजन वाढण्याची समस्या जाणवते. रक्तातील साखर किंवा कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास अडचण येऊ शकते. मात्र अनेक रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे ज्यांचं वजन जास्त आहे, मधुमेह आहे किंवा कुटुंबात अशा आजारांचा इतिहास आहे त्यांनी नियमित तपासणी करून घेणं आवश्यक आहे.
फॅटी लिव्हरवर नियंत्रण मिळवण्यासाठी औषधांइतकीच जीवनशैली महत्त्वाची आहे. वजन कमी करणं हा त्यातील सर्वात प्रभावी उपाय आहे. शरीराच्या एकूण वजनापैकी केवळ ५ ते १० टक्के वजन कमी झालं तरी लिव्हरच्या आरोग्यात चांगला फरक पडू शकतो.
त्याचप्रमाणे आहारात ताज्या भाज्या, फळं, कडधान्ये आणि संपूर्ण धान्यांचा समावेश करावा. साखरयुक्त पेयं, जंक फूड, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि जास्त प्रमाणातील मद्यपान टाळणं फायदेशीर ठरतं.
लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी नियमित व्यायाम अत्यंत आवश्यक आहे. आठवड्याला किमान १५० मिनिटे शारीरिक हालचाल करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. चालणं, धावणं, सायकलिंग यापैकी कोणताही प्रकार नियमित करता येतो. व्यायामामुळे वजन कमी होण्यास मदत होते आणि शरीराचं एकूण आरोग्यही सुधारतं.
अपुरी झोप आणि सततचा मानसिक ताण यांचाही फॅटी लिव्हरवर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे दररोज पुरेशी झोप घेणं, कामाचा ताण कमी ठेवणं आणि योग, ध्यान किंवा इतर रिलॅक्सेशनच्या पद्धतींचा अवलंब करणं फायदेशीर ठरतं.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.