Quick and simple winter soup recipes in Marathi saam tv
लाईफस्टाईल

Healthy winter recipes : हिवाळ्यात घरीच बनवा ५ प्रकारचे चविष्ट आणि पौष्टिक गरमागरम सूप; जाणून घ्या सोप्या रेसिपी

Easy homemade soup recipes for winter season : हिवाळ्यात संध्याकाळच्या वेळी काहीतरी गरमागरम पिण्याची इच्छा होते. अशा वेळी काही वेगळ्या प्रकारचे सूप तयार करून पाहा.

Saam Tv

हिवाळ्यात गरमागरम सूप पिण्याची मजा काही औरच असते. थंडीच्या दिवसांत संध्याकाळी भूक लागल्यावर किंवा हलकेफुलके काहीतरी खाण्याची इच्छा झाल्यावर सूप हा चांगला पर्याय ठरू शकतो. सूपमुळे शरीराला उब मिळते आणि भाज्यांचा आहारात समावेश करणेही सोपे होते.

मात्र, रोज एकाच प्रकारचे सूप पिऊन कंटाळा आला असेल, तर यंदाच्या हिवाळ्यात काही वेगळ्या रेसिपी नक्की करून पाहा. टोमॅटो-लसूण, स्वीट कॉर्न, पालक-लसूण, गाजर-अद्रक आणि मिक्स व्हेज अशा पाच प्रकारच्या सूपची चव तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मग, जाणून घेऊया या सूपच्या सोप्या रेसिपी.

टोमॅटो आणि लसूण सूप

टोमॅटो सूप अनेकांना आवडते. मात्र, त्यात लसणाची भर घातल्यास सूपची चव आणखी खुलते. हे सूप तयार करण्यासाठी टोमॅटो स्वच्छ धुऊन त्यांचे मोठे तुकडे करून घ्यावेत. एका कढईत बटर गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा आणि लसूण घालून हलके परतून घ्यावे. कांदा मऊ झाल्यानंतर त्यात टोमॅटोचे तुकडे घालावेत. दोन ते तीन मिनिटे परतल्यानंतर त्यात थोडे पाणी घालून कढई झाकून ठेवावी. टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवावेत. त्यानंतर गॅस बंद करून मिश्रण थोडे थंड होऊ द्यावे.

हे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. टोमॅटोच्या बिया आणि साल नको असल्यास मिश्रण गाळून घ्यावे. त्यानंतर पुन्हा कढईत काढून आवश्यकतेनुसार पाणी घालावे. त्यात मीठ आणि काळी मिरी पूड टाकून तीन ते चार मिनिटे उकळावे. अशा प्रकारे गरमागरम टोमॅटो-लसूण सूप तयार होईल.

स्वीट कॉर्न सूप

लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना स्वीट कॉर्न सूप आवडते. किंचित गोडसर चव आणि घट्टसर पोत असलेले हे सूप सकाळी किंवा संध्याकाळी कधीही घेता येते. हे सूप तयार करण्यासाठी सर्वप्रथम स्वीट कॉर्न पाण्यात उकळून घ्यावे. त्यातील अर्धे दाणे थोडे पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावेत. उरलेले दाणे तसेच बाजूला ठेवावेत. आता एका पॅनमध्ये थोडे बटर गरम करून त्यात किसलेले आले घालून परतावे. त्यानंतर गाजर, फरसबी आणि उरलेले अख्खे कॉर्न घालून दोन ते तीन मिनिटे शिजवावे.

भाज्या किंचित मऊ झाल्यानंतर त्यात वाटलेले कॉर्न आणि सुमारे दोन कप पाणी घालावे. एका वाटीत कॉर्नफ्लोअर घेऊन त्यात थोडे पाणी मिसळून गुठळ्या होणार नाहीत अशा प्रकारे पातळ मिश्रण तयार करावे. हे मिश्रण सूपमध्ये घालून काही वेळ शिजवावे. शेवटी मीठ आणि काळी मिरी पूड घालून व्यवस्थित मिसळावे. सूप घट्टसर झाल्यानंतर गॅस बंद करावा. वरून बारीक चिरलेली कांदापात घालून गरमागरम सर्व्ह करावे.

पालक आणि लसूण सूप

हिवाळ्यात पालक मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो. पालकाची भाजी किंवा पराठे खाऊन कंटाळा आला असेल, तर यापासून चविष्ट सूप तयार करता येते. लसणामुळे या सूपची चव अधिक छान लागते. हे सूप तयार करण्यासाठी सर्वप्रथम पालकाची पाने स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्यावीत. एका पॅनमध्ये बटर गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा आणि लसूण घालून हलके परतावे. कांदा मऊ झाल्यानंतर त्यात पालकाची पाने घालून दोन ते तीन मिनिटे शिजवावे. पालक थोडा मऊ झाल्यावर त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून आणखी काही वेळ शिजवावे.

त्यानंतर गॅस बंद करून मिश्रण थंड होऊ द्यावे. हे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. तयार पेस्ट पुन्हा पॅनमध्ये काढून त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालावे. त्यानंतर मीठ आणि काळी मिरी पूड घालून काही मिनिटे मंद आचेवर शिजवावे. सूपला किंचित मलईदार चव हवी असल्यास गॅस बंद करण्यापूर्वी त्यात एक ते दोन चमचे फ्रेश क्रीम घालून मिसळावे. अशा प्रकारे पालक-लसूण सूप तयार होईल.

गाजर आणि अद्रक सूप

गाजरापासून हलवा, कोशिंबीर आणि भाजी असे अनेक पदार्थ बनवले जातात. मात्र, गाजर आणि अद्रक यांचे सूपही अतिशय चविष्ट लागते. गाजराचा किंचित गोडसर स्वाद आणि अद्रकाचा झणझणीतपणा यामुळे या सूपला वेगळीच चव मिळते. हे सूप तयार करण्यासाठी सर्वप्रथम गाजर सोलून त्याचे लहान तुकडे करून घ्यावेत. एका पॅनमध्ये बटर गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा आणि किसलेले अद्रक घालून हलके परतावे. कांदा मऊ झाल्यानंतर त्यात गाजराचे तुकडे घालून दोन मिनिटे परतावे. त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून पॅन झाकून ठेवावे. गाजर मऊ होईपर्यंत शिजवावे.

गाजर व्यवस्थित शिजल्यानंतर गॅस बंद करून मिश्रण थोडे थंड होऊ द्यावे. त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. तयार पेस्ट पुन्हा पॅनमध्ये काढून त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालावे. शेवटी मीठ आणि काळी मिरी पूड घालून सूप पुन्हा गरम करावे. गरमागरम गाजर-अद्रक सूप सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.

मिक्स व्हेज सूप

घरात थोड्या-थोड्या भाज्या उरल्या असतील, तर त्यांचा वापर करून चविष्ट मिक्स व्हेज सूप तयार करता येते. गाजर, फरसबी, मटार आणि कोबी यांसारख्या भाज्यांपासून हे सूप बनवता येते. त्यामुळे उरलेल्या भाज्यांचाही योग्य वापर होतो. हे सूप तयार करण्यासाठी सर्वप्रथम सर्व भाज्या स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्याव्यात. एका पॅनमध्ये थोडे तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला लसूण आणि कांदा घालून परतावे. कांदा मऊ झाल्यानंतर त्यात गाजर, फरसबी, मटार आणि कोबी घालून दोन ते तीन मिनिटे शिजवावे. त्यानंतर त्यात दोन ते तीन कप पाणी घालून भाज्या मऊ होईपर्यंत शिजवाव्यात. मात्र, भाज्या पूर्णपणे गळून जाऊ देऊ नयेत.

आता एका वाटीत कॉर्नफ्लोअर घेऊन त्यात थोडे पाणी घालून व्यवस्थित मिसळावे. हे मिश्रण सूपमध्ये घालून काही मिनिटे शिजवावे. त्यामुळे सूपला घट्टपणा येईल. शेवटी मीठ आणि काळी मिरी पूड घालून व्यवस्थित मिसळावे. गॅस बंद केल्यानंतर वरून बारीक चिरलेली कांदापात घालून गरमागरम सर्व्ह करावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परळी रेल्वे स्टेशनवरील लिफ्ट पडली बंद

Delimitation Bill:स्टॅलिन यांची मनधरणी करण्यासाठी राहुल-सोनिया गांधी मैदानात! 20 दिग्गज नेत्यांची फौज चेन्नईत दाखल, यादी आली समोर

Vande Bharat : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! वंदे भारतसह सर्व रेल्वे गाड्यांतून मोफत प्रवास करता येणार, कोणाला मिळणार हा लाभ?

महिलांसाठी ब्लाऊजच्या हटके डिझाईन्स, साडी आणि लेहेंग्यावर दिसतील शोभून

Maharashtra Politics: ठाकरेसेनेच्या ६ बंडखोरांना व्हिप लागू होणार का? पक्षाने बोलावली तातडीची बैठक

SCROLL FOR NEXT