शरीरातील वाढलेलं कोलेस्ट्रॉल ही भविष्यातील हार धोक्याची घंटा मानली जाते. विशेषतः ‘बॅड कोलेस्ट्रॉल’ म्हणजेच LDL कोलेस्ट्रॉल जास्त असल्यास रक्तवाहिन्यांमध्ये चरबीचा थर साचू शकतो. त्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होण्याचा धोका वाढतो आणि गंभीर परिस्थितीत हार्ट अटॅकसारखी समस्या उद्भवू शकते.
त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढलेलं असल्यास आहार आणि जीवनशैलीकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. डॉक्टरांनी औषधं सांगितली असतील तर ती नियमित घेणं महत्त्वाचं आहे. त्यासोबतच आहारात काही पदार्थांचा योग्य पद्धतीने समावेश केल्यानेही फायदा होऊ शकतो. यापैकी लसणाचा उल्लेख अनेकदा केला जातो.
लसणामध्ये ‘एलिसिन’ नावाचा एक नैसर्गिक घटक असतो. लसूण कापल्यावर किंवा चिरल्यावर हा घटक तयार होतो. कोलेस्ट्रॉलच्या पातळीवर परिणाम करण्यासाठी एलिसिन महत्त्वाची भूमिका बजावू शकतो असं काही संशोधनातून समोर आलंय.
लसणाचा फायदा केवळ बॅड कोलेस्ट्रॉलपुरता मर्यादित नाही. त्यामध्ये असलेल्या घटकांमुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास आणि शरीराला अँटीऑक्सिडंट्स मिळण्यासही लसूण उपयोगी ठरू शकतो.
काही अभ्यासांमध्ये असं सांगण्यात आलंय की, सकाळी लसणाची एक पाकळी सोलून खाल्ल्याने वाढलेलं कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होऊ शकते. काही ठिकाणी १५ ते २० दिवसांत त्याचा परिणाम दिसू शकतो, असा दावा करण्यात आला आहे.
इस्त्रायलमधील ‘इन्स्टिट्यूट ऑफ लिपिड अँड एथेरोस्क्लेरोसिस रिसर्च’च्या संदर्भातही लसणातील एलिसिनबाबत माहिती देण्यात आलीये. या माहितीनुसार एलिसिन लिव्हरमधील काही रिसेप्टर्सवर परिणाम करून बॅड कोलेस्ट्रॉल तयार होण्याची प्रक्रिया कमी करण्यास मदत करू शकतो. ही प्रक्रिया शरीरातील पेशींच्या पातळीवर होत असते. या प्रक्रियेचा चांगल्या कोलेस्ट्रॉलवर फारसा परिणाम होत नाही, असं सांगितलं जातं.
अभ्यासांनुसार, दिवसातून एक ते दोन पाकळ्या कच्चा लसूण खाणं सामान्यतः सुरक्षित मानलं जातं. तो जेवणासोबत किंवा जेवणाच्या आधीही खाऊ शकता. मात्र लसूण किती प्रमाणात घ्यावा याबाबत सर्वांसाठी लागू होईल अशी ठोस मार्गदर्शक सूचना नाहीये. लसणाचे सप्लिमेंट्स किंवा जास्त प्रमाणात लसूण घेणाऱ्यांनी काळजी घेणं आवश्यक आहे.
लसूण जास्त प्रमाणात घेतल्यास काही लोकांना गॅस, अपचन, छातीत जळजळ, जुलाब किंवा तोंडाला दुर्गंधी यांसारखे त्रास होऊ शकतात.
लसणामध्ये रक्त पातळ करण्यास मदत करणारे गुणधर्म असू शकतात. त्यामुळे ज्यांना रक्तस्रावाशी संबंधित समस्या आहेत, त्यांनी लसणाचं सेवन करताना विशेष काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे लसूण काही औषधांच्या परिणामावरही परिणाम करू शकतो. त्यामुळे तुम्ही नियमित औषधं घेत असाल किंवा कोलेस्ट्रॉल, रक्तदाब किंवा रक्त पातळ करण्यासाठी औषधं सुरू असतील तर स्वतःहून लसणाचं सेवन वाढवण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.