B12 कमतरता शाकाहारी आणि वृद्धांमध्ये जास्त प्रमाणात आढळते.
थकवा, चिडचिड, स्मरणशक्ती कमी होणे, हातपाय सुन्नपणा ही प्रमुख लक्षणे.
B12 मेंदूतील सेरोटोनिन तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.
व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे शरीरात आणि रोजच्या दैनंदिन आयुष्यात खूप बदल होत असतात. सकाळी उठल्यावर थकलेल्यासारखे वाटते, कामात लक्ष लागत नाही किंवा मन सतत खिन्न वाटत असेल, खूप चिडचिड होत असेल तर हे फक्त ताण-तणावाचे लक्षण नसते. तुमच्या शरीरात एका अत्यावश्यक पोषक तत्वाची कमतरता असू शकते व्हिटॅमिन B12. मेंदूची कार्यक्षमता, आरोग्य आणि ऊर्जा स्थिर ठेवण्यासाठी B12 खूप महत्त्वाचे असते. डॉक्टरांच्या मते ही कमतरता विशेषत: शाकाहारी आणि वृद्धांमध्ये जास्त प्रमाणात आढळते.
राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या माहितीनुसार, शरीरात लाल रक्तपेशी तयार करणे, नर्व्हचे संरक्षण करणे आणि DNA निर्मिती करणे या सर्व प्रक्रियांमध्ये B12 आवश्यक असते. जेव्हा B12 चे प्रमाण कमी होते, तेव्हा शरीराला ऑक्सिजन पुरवठा योग्य प्रकारे करता येत नाही आणि त्यामुळे अशक्तपणा, सतत थकवा, चिडचिड किंवा एकाग्रता कमी होणे अशी लक्षणे दिसू शकतात.
भारतीयांमध्ये B12 व्हिटॅमिनची कमतरता का जास्त आहे?
व्हिटॅमिन B12 हे प्रामुख्याने पशूजन्य पदार्थांमध्ये अंडी, दूध, मासे आणि मांस आढळते. त्यामुळे शाकाहारी आणि व्हेगन लोकांमध्ये ही कमतरता जास्त प्रमाणात दिसते. AIIMS च्या 2020 च्या अभ्यासानुसार, जवळपास निम्म्या भारतीयांमध्ये B12 चे प्रमाण अपुरे आढळले, विशेषत: शहरी भागातील त्या लोकांमध्ये जे फारसे डेअरी किंवा प्रोटीनयुक्त पदार्थ सेवन करत नाहीत.
ही लक्षणे दिसत असतील तर सावध!
व्हिटॅमिन B12 ची कमतरता हळूहळू वाढत जाते, त्यामुळे लक्षणेही अनेकदा दुर्लक्षिली जातात किंवा डिप्रेशन, चिंताची संबंधित समस्या समजून चूक होते. सततचा थकवा, हात-पाय सुन्न होणे, स्मरणशक्ती कमी होणे, चिडचिड, त्वचा पांढरट दिसणे, श्वास लागणे, संतुलन बिघडणे किंवा जखमा हळू भरून येणे ही सर्व लक्षणे B12 कमतरतेची चिन्हे असू शकतात.
मेंदू आणि मानसिक आरोग्यावर परिणाम
व्हिटॅमिन B12 मेंदूत सेरोटोनिन तयार करण्यास मदत करते. हा मूड आणि झोप नियंत्रित करणारा रसायन आहे. त्यामुळे B12 कमी झाल्यास मन खिन्न होणे, मेंदू धूसर वाटणे (ब्रेन फॉग), चिंता किंवा नैराश्यसारखी लक्षणे जाणवू शकतात. हार्वर्ड हेल्थच्या विश्लेषणातही वृद्धांमध्ये कमी B12 पातळीचा स्मरणशक्ती आणि विचारशक्तीवर परिणाम होतो, असे आढळले.
कुठून मिळते B12?
हलकी कमतरता आहारातून भरून येऊ शकते, तर गंभीर प्रकरणात सप्लिमेंट्स किंवा इंजेक्शनची गरज लागते. अंडी, दूध, दही, मासे आणि चिकन ही B12 ची चांगली स्रोत आहेत. शाकाहारी आणि व्हेगन लोकांसाठी फोर्टिफाइड धान्ये किंवा प्लांट मिल्क उत्तम पर्याय आहेत.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.