Sakshi Sunil Jadhav
हिवाळ्यात छान गरमा गरम नाश्ता किंवा जेवण प्रत्येकालाच तृप्त करतं. या जेवणामध्ये पुऱ्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. पण त्याऐवजी तुम्ही कुरकुरीच चविष्ठ नारळाचे पारंपारिक पद्धतीने वडे तयार करू शकता.
पुढे आपण कमीत कमी साहित्यात हिवाळ्यातला पौष्टीक आणि पारंपारिक पदार्थाची रेसिपी जाणून घेणार आहोत. हे नारळाचे वडे तुम्ही कालवण, रस्सा किंवा चहासोबत खाऊ शकता.
तुम्ही ४ ते ६ व्यक्तींसाठी वडे करणार असाल तर पुढील साहित्य तुमच्यासाठी योग्य ठरेल. पुढे तुम्हाला सोप्या पद्धतीत रेसिपी देण्यात आली आहे.
दोन वाट्या तांदूळ, अर्धी वाटी तूरीची डाळ, अर्धी वाटी उडदाची डाळ, ५ ते ६ सुक्या लाल मिरच्या, ४ ते ५ हिरव्या मिरच्या, २ वाट्या बारिक किसलेले खोबरं, कोथिंबीर, मीठ, तेल इ.
सर्वप्रथम तांदूळ आणि डाळी व्यवस्थित धुवून भिजत घाला. तुम्ही रात्रभर जरी भिजत घातले तरी चालेल. पण कमीत कमी ४ तरी भिजत ठेवा. त्याने पीठ छान फुलतं.
चार तासांनी सर्व डाळी आणि तांदूळ पाण्यातून काढून घ्याव्यात. आता एका मिक्सरच्या भांड्यांमध्ये हे मिश्रण घालून ठेवा.
आता तुम्हाला याचे डोश्याच्या पिठापेक्षा घट्टसर वाटायचे आहे. त्यासाठी तुम्ही मिक्सर चालू बंद करून सुरु करू शकता. तसेच वाटणात पाणी घालू नका.
पुढे हिरव्या आणि लाल मिरच्या बारिक वाटून घ्या. यानंतर तांदूळ, डाळ वाटलेल्या पिठात मिरचीचा गोळा, चिरलेली कोथिंबीर, खोबरं आणि मीठ घाला.
आता सगळे साहित्य एकसारखं कालवून घ्या. तयार पिठाचे गोळे करून थापा आणि छान खरपूस तळून घ्या. हे वडे कोणत्याही चटणीसोबत खायला छान लागतात.