मुलांच्या वाढीसाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी योग्य आहार खूप महत्त्वाचा आहे. मात्र धावपळीचं जीवन, बदलती जीवनशैली आणि सहज उपलब्ध होणारे पॅकेज्ड पदार्थ यामुळे मुलांच्या आहाराकडे अनेकदा दुर्लक्ष होतं. मुलाने पुरेसे खाल्लं म्हणजे त्याला योग्य पोषण मिळालं, असं नाही. त्याच्या ताटात कोणते पदार्थ आहेत आणि त्यातून शरीराला आवश्यक पोषक घटक मिळत आहेत का, हेही तितकेच महत्त्वाचे आहे.
राष्ट्रीय पोषण सप्ताह 2026 निमित्त मुलांच्या आहाराकडे नव्याने पाहण्याची गरज आहे. मुलांच्या वाढीच्या वयात शरीराचा तसेच मेंदूचा विकास वेगाने होत असतो. त्यामुळे या काळात प्रथिने, कर्बोदके, चांगले फॅट, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांची शरीराला गरज असते.
एखादे मूल भरपूर जेवत असेल, तरी त्याच्या शरीराला आवश्यक असलेलं सर्व पोषक घटक मिळत असतीलच असं नाही. केवळ पोट भरण्यापेक्षा आहारातून शरीराला योग्य पोषण मिळणं महत्त्वाचं आहे.
आहारात लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, झिंक किंवा प्रथिनांची कमतरता असेल तर त्याचा परिणाम मुलाच्या वाढीवर होऊ शकतो. मुलाची ऊर्जा कमी होणं, अभ्यासात लक्ष न लागणं, वारंवार आजारी पडणे किंवा रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. काही वेळा लहानपणीच्या चुकीच्या आहाराचा परिणाम पुढील आयुष्यावरही होऊ शकतो.
भारतासमोर आता पोषणाची आणखी एक समस्या आहे. मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण वाढतंय. पॅकेज्ड स्नॅक्स, गोड पेये, फास्ट फूड आणि जास्त प्रक्रिया केलेले पदार्थ मुलांच्या आहारात वाढले आहेत. या पदार्थांमध्ये कॅलरी जास्त असू शकतात. मात्र शरीराला आवश्यक असलेले पोषक घटक कमी असू शकतात. त्यामुळे मुलांना अन्नापासून दूर ठेवणं किंवा त्यांच्या आवडीचे पदार्थ पूर्णपणे बंद करणं हा उपाय नाही.
“मुलाने किती खाल्ले यापेक्षा त्याने काय खाल्ले, याकडे पालकांनी लक्ष देणे महत्त्वाचे आहे. मुलांच्या वाढीच्या काळात योग्य पोषण मिळाल्यास त्यांची शारीरिक वाढ, शिकण्याची क्षमता आणि एकूण आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. त्यामुळे आहारात विविध प्रकारचे पौष्टिक पदार्थ असणं गरजेचं आहे.” असं नारायणा हेल्थ SRCC चिल्ड्रन्स हॉस्पिटलच्या क्लिनिकल न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स दिव्या आचरेकर यांनी सांगितलं.
मुलांच्या जेवणात वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांचा समावेश असावा. तांदूळ, पोळी, संपूर्ण धान्य, ज्वारी-बाजरीसारखी मिलेट्स यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.
डाळी, कडधान्ये, राजमा, छोले, दूध-दही, अंडी किंवा मुलासाठी योग्य असलेले इतर प्रोटीनचे पदार्थ वाढीसाठी आणि शरीरातील स्नायू आणि इतर भागांच्या विकासासाठी महत्त्वाचे आहेत. भाज्या आणि फळांमधून जीवनसत्त्वं, खनिजे आणि फायबर मिळतं. बदाम, अक्रोड, इतर कडधान्यं आणि बिया यांचा योग्य प्रमाणात आहारात समावेश केल्यास शरीराला चांगले फॅट आणि इतर पोषक घटक मिळू शकतात.
मुलांच्या आरोग्यासाठी पुरेसं पाणी पिणंही महत्त्वाचं आहे. मुलांसाठी पाणी हे मुख्य पेय असावं. गोड शीतपेय, पॅकेज्ड ज्यूस आणि एनर्जी ड्रिंक्स शक्य तितके कमी द्यावेत.
मुलांना चांगल्या खाण्याच्या सवयी लावण्यासाठी केवळ त्यांना नियम सांगून उपयोग होत नाही. घरातील मोठे काय खातात, कसे खातात, हे पाहूनही मुलं अनेक गोष्टी शिकतात. त्यामुळे निरोगी आहार हा फक्त मुलांसाठीचा नियम न ठेवता संपूर्ण कुटुंबाची सवय बनवणं अधिक योग्य ठरतं.
निरोगी आहार म्हणजे मुलांना त्यांच्या आवडीचे पदार्थ कायमचे बंद करणं नाही. अधूनमधून आवडतं पदार्थ खाल्ले तरी चालतात. मात्र, त्याचे प्रमाण कमी असावे. आहारात विविधता, योग्य प्रमाण आणि सातत्य ठेवणे महत्त्वाचे आहे.
पौष्टिक आहारासाठी नेहमी महागडे पदार्थ खरेदी करण्याची गरज नाही. भारतात अनेक स्वस्त आणि पौष्टिक पदार्थ सहज उपलब्ध आहेत. डाळ, भाज्या, हंगामी फळे, दही, संपूर्ण धान्य, ज्वारी-बाजरीसारखी मिलेट्स, कडधान्ये, कडू-बिया आणि इतर बिया यांचा रोजच्या जेवणात सहज समावेश करता येतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.