हिंदू धर्मात पितृ पक्ष हा पूर्वजांच्या स्मरणाचा काळ मानला जातो. या काळात आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी आणि त्यांचे आशीर्वाद कुटुंबाला मिळावेत, यासाठी श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान केले जाते. पितरांच्या नावाने दानधर्म आणि इतर धार्मिक कामेही केली जातात. यामुळे पूर्वजांचे समाधान होते, अशी धार्मिक मान्यता आहे.
पितृ पक्षात कुटुंबाच्या सुख-शांतीसाठीही अनेक धार्मिक विधी केले जातात. श्राद्धाच्या दिवशी ब्राह्मणांना जेवण देण्याची तसेच गाय, कुत्रा, कावळा, मुंग्या आणि इतर जीवांना अन्न देण्याची परंपरा आहे.
पितृ पक्षात कावळ्याला अन्न देण्याला विशेष महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार कावळ्याला पितरांचं प्रतीक मानलं जातं. तसंच कावळा हा यमराजाचा दूत असल्याचंही मानलं जातं. श्राद्धाच्या वेळी तयार केलेल्या अन्नाचा काही भाग कावळ्यासाठी ठेवला जातो. कावळ्याने हे अन्न खाल्लं तर ते पूर्वजांपर्यंत पोहोचतं आणि त्यांना समाधान मिळतं, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे श्राद्ध करणारे लोक कावळ्यासाठी आवर्जून अन्न ठेवतात.
अनेकदा शहरांमध्ये कावळे दिसत नाहीत किंवा अन्न ठेवूनही कावळा ते खाण्यासाठी येत नाही. अशावेळी काय करावं, असा प्रश्न अनेकांना पडतो. याबाबत धार्मिक मान्यता काय सांगतात, ते जाणून घेऊया.
यंदा म्हणजेच 2026 मध्ये पितृ पक्षाची सुरुवात 26 सप्टेंबरपासून होणार आहे. तर 10 ऑक्टोबरला सर्वपितृ अमावस्येला पितृ पक्षाची सांगता होईल. या काळात पूर्वजांच्या मृत्यूच्या तिथीनुसार श्राद्ध केलं जातं. पूर्णिमा श्राद्धापासून अमावस्येपर्यंत वेगवेगळ्या तिथींना पितरांच्या स्मरणार्थ धार्मिक विधी केले जातात.
पूर्णिमा श्राद्ध: 26 सप्टेंबर 2026, शनिवार
प्रतिपदा श्राद्ध: 27 सप्टेंबर 2026, रविवार
सर्वपितृ अमावस्या: 10 ऑक्टोबर 2026, शनिवार
धार्मिक आणि पौराणिक कथांमध्ये कावळ्याला पितरांशी जोडलं गेलंय. पूर्वज कावळ्याच्या रूपात येऊन श्राद्धाचे अन्न ग्रहण करतात, अशी एक धार्मिक मान्यता आहे. गरुड पुराणाशी संबंधित मान्यतेनुसार, कावळ्याला यमराजाचा दूत किंवा संदेशवाहकही मानले जाते. त्यामुळे पितृ पक्षात कावळ्याला अन्न देण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे.
ज्योतिषशास्त्रातील काही मान्यतांमध्ये कावळ्याचा संबंध शनि, राहू आणि केतू या ग्रहांशी जोडला जातो. त्यामुळे कावळ्याला अन्न देणं शुभ मानलं जातं. यामुळे पितृदोष तसंच ग्रहांशी संबंधित अडचणी कमी होतात, अशीही धार्मिक श्रद्धा आहे.
श्राद्धाचं अन्न ठेवूनही कावळा खाण्यासाठी आला नाही तर घाबरण्याची किंवा काळजी करण्याची गरज नाही. धार्मिक मान्यतेनुसार, कावळा आला नाही तरी त्याच्यासाठी ठेवलेले अन्न इतर जीवांना खाऊ घालता येते. पंचबलीचा भाग म्हणून हे अन्न गाय, कुत्रा, मुंग्या किंवा इतर पक्ष्यांना श्रद्धेने देता येते.
कावळा आला नाही तर त्याच्यासाठी ठेवलेलं अन्न गायीला खाऊ घालणं हा एक पर्याय मानला जातो. श्राद्धातील अन्नाचा काही भाग गायीला देणं शुभ आणि चांगलं मानलं जातं.
कावळा दिसत नसल्यास अन्नाचा काही भाग कुत्रा, मुंग्या आणि इतर पक्ष्यांसाठी ठेवू शकता. श्रद्धेने दिलेले अन्न कोणत्याही जीवाला खाऊ घालता येते, अशी धार्मिक मान्यता आहे.
श्राद्धाच्या अन्नातील एक भाग गायीला देणं शुभ आणि फलदायी मानलं जातं. त्यामुळे कावळा आला नाही म्हणून श्राद्धाचा विधी अपूर्ण राहतो, असे मानण्याची गरज नाही.
कावळा किंवा इतर जीव उपलब्ध नसतील तर श्रद्धेने अन्न एखाद्या पवित्र ठिकाणी, मंदिरात किंवा झाडाखाली ठेवता येतं. काही ठिकाणी अन्न पाण्यात सोडण्याची किंवा विसर्जित करण्याची पद्धतही सांगितली जातं.
कावळ्याला अन्न दिल्याने घरातील आर्थिक परिस्थिती सुधारते आणि कर्जाचा त्रास कमी होतो, अशीही धार्मिक मान्यता आहे. महत्त्वाचे म्हणजं, कावळा श्राद्धाचे अन्न खाण्यासाठी आला नाही म्हणून मनात भीती ठेवण्याची गरज नाही. श्रद्धेने केलेले श्राद्ध, तर्पण आणि दानधर्म महत्त्वाचं मानलं जातात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.