कोकणातील दापोली हे निसर्गसौंदर्यासोबतच ऐतिहासिक वारशासाठीही प्रसिद्ध आहे. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले दापोली परिसर अनेक ऐतिहासिक जलदुर्ग आणि डोंगरी किल्ल्यांनी समृद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, मराठ्यांची आरमारशक्ती आणि कोकणातील प्राचीन स्थापत्यकलेची ओळख करून घ्यायची असेल तर दापोली परिसरातील हे किल्ले नक्की भेट देण्यासारखे आहेत.
सुवर्णदुर्ग किल्ला
सुवर्णदुर्ग हा अरबी समुद्रातील बेटावर बांधलेला ऐतिहासिक जलदुर्ग आहे. सुरुवातीला हा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात होता. १६६० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तो जिंकून स्वराज्यात सामील केला. सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या आरमारी कारवायांसाठी हा किल्ला महत्त्वाचा होता. समुद्राच्या मध्यभागी असलेला हा किल्ला मराठ्यांच्या आरमारशक्तीची साक्ष देतो. हर्णै बंदरातून बोटीने जाता येते.
कनकदुर्ग किल्ला
सुवर्णदुर्गाच्या संरक्षणासाठी उभारण्यात आलेल्या किनारी किल्ल्यांपैकी कनकदुर्ग हा एक महत्त्वाचा किल्ला आहे. हा किल्ला समुद्रकिनाऱ्याला लागून असलेल्या खडकाळ भूभागावर वसलेला आहे. किल्ल्यावर जुन्या तटबंदीचे अवशेष आणि दीपगृह पाहायला मिळते.समुद्राचे सुंदर दृश्य आणि हर्णै बंदराचा परिसर पाहण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे.
गोवा किल्ला
सुवर्णदुर्गाच्या संरक्षणासाठी बांधण्यात आलेल्या किनारी दुर्गव्यवस्थेतील हा एक महत्त्वाचा किल्ला होता. समुद्रकिनाऱ्याजवळ असलेली तटबंदी आणि किल्ल्याचे अवशेष येथे पाहायला मिळतात. हा किल्ला सुवर्णदुर्ग, कनकदुर्ग आणि फत्तेगड यांच्या संरक्षणव्यवस्थेशी संबंधित होता.
पाळगड किल्ला
कोकणातील सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेला हा छोटा डोंगरी किल्ला आहे. किल्ल्यावर तटबंदीचे अवशेष, बुरुज आणि जुन्या वास्तूंचे अवशेष पाहायला मिळतात. किल्ल्याच्या माथ्यावरून आजूबाजूच्या हिरव्यागार डोंगरांचे सुंदर दृश्य दिसते. किल्ल्यावर जाण्यासाठी गावातून पायवाटेने चढाई करावी लागते. काही मार्गांवरून साधारण अर्ध्या तासात माथ्यावर पोहोचता येते.
दाभोळ किल्ला
प्राचीन काळापासून दाभोळ हे कोकणातील महत्त्वाचे व्यापारी बंदर म्हणून ओळखले जात होते. त्यामुळे या परिसराला संरक्षणाच्या दृष्टीने ऐतिहासिक महत्त्व होते. किल्ल्याचे काही अवशेष आणि परिसरातील जुन्या वास्तू पाहायला मिळतात. दाभोळच्या ऐतिहासिक बंदराचा आणि कोकणातील सागरी व्यापाराचा इतिहास जाणून घेण्यासाठी हे ठिकाण महत्त्वाचे आहे.
फत्तेगड किल्ला
सुवर्णदुर्गाच्या संरक्षणासाठी उभारलेल्या तीन किनारी किल्ल्यांपैकी फत्तेगड हा एक आहे. शिवाजी महाराजांच्या काळानंतर खैरियत खानाने हा किल्ला उभारल्याचे उल्लेख आढळतात.किल्ल्याची तटबंदी आणि काही जुने अवशेष आजही पाहायला मिळतात.
बाणकोट किल्ला
बाणकोटचा किल्ला पूर्वी हिम्मतगड म्हणूनही ओळखला जात असे. कोकण किनारपट्टीवरील सागरी मार्ग आणि खाडीवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचे महत्त्व होते. सावित्री नदीच्या खाडीच्या परिसरात असलेला हा किल्ला निसर्गरम्य वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. किल्ल्यावरून समुद्र, खाडी आणि आजूबाजूचा परिसर पाहता येतो.
मंडणगड किल्ला
सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेला हा ऐतिहासिक डोंगरी किल्ला आहे. स्थानिक इतिहास आणि दुर्गसंस्कृतीच्या दृष्टीने त्याला महत्त्व आहे. किल्ल्यावर गणेश मंदिर, जुनी पाण्याची टाकी आणि तोफ पाहायला मिळते. किल्ल्याची तटबंदी मोठ्या प्रमाणात नष्ट झाली असली तरी ऐतिहासिक अवशेष आजही पाहायला मिळतात. किल्ल्यावर जाण्यासाठी चढाई करावी लागते. त्यामुळे पावसाळ्यानंतर किंवा हिवाळ्यात भेट देणे चांगले.
नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा काळ दापोलीतील किल्ल्यांना भेट देण्यासाठी योग्य वेळ आहे. पावसाळ्यानंतर येथे डोंगर आणि परिसर हिरवागार दिसतो. किल्ले पाहण्यासाठी आणि चढाई करण्यासाठी सकाळी लवकर निघणे योग्य आहे.
टीप : वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.