Pneumonia in Children saam tv
लाईफस्टाईल

Pneumonia in Children: खोकला, ताप आणि श्वास घेण्यास त्रास? मुलांमध्ये न्यूमोनियाची ही लक्षणं वेळीच ओळखा

मुलांमध्ये सतत खोकला, ताप, वेगाने श्वास घेणे किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर न्यूमोनियाची शक्यता दुर्लक्षित करू नका. न्यूमोनियाची लक्षणे, गंभीर संकेत, उपचार, लसीकरण आणि मुलांचा बचाव करण्यासाठी आवश्यक काळजी जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

घरातील लहान मुलांना खोकला किंवा ताप आला की अनेकदा पालक ‘हवामानामुळे असेल’ किंवा ‘दोन-चार दिवसांत बरा होईल’ असं म्हणत त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र खोकला, ताप आणि श्वास घेण्याचा त्रास वाढत असेल तर त्यामागे न्यूमोनियासारखा गंभीर संसर्ग असू शकतो. लहान मुलांची प्रकृती कमी वेळात बिघडू शकते. त्यामुळे अशी लक्षणं दिसताच वेळ न घालवता डॉक्टरांचा सल्ला घेणं आणि योग्य उपचार सुरू करणं गरजेचं आहे.

पुण्यातील औधंमधील अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमेन अँड चिल्ड्रन हॉस्पिटलचे ॲलर्जी अँड स्लीप स्पेशॅलिस्ट आणि बालरोग आणि फुफ्फुसविकार तज्ज्ञ डॉ. मौनिश बालाजी यांनी सांगितलं की, “मुलाला अनेक दिवसांपासून खोकला, ताप किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर पालकांनी त्याकडे दुर्लक्ष करू नये. न्यूमोनियामुळे फुफ्फुसांना सूज येते आणि त्यामुळे मुलाला श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. लहान बाळ, अकाली जन्मलेली मुले आणि रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या मुलांमध्ये हा आजार गंभीर होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे लक्षणं दिसताच डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. स्वतःहून औषधं देण्याऐवजी डॉक्टरांनी सांगितलेले उपचार घ्यावेत.”

न्यूमोनिया म्हणजे काय?

न्यूमोनियामध्ये फुफ्फुसांना सूज येते. त्यामुळे मुलाला श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. हा आजार कोणत्याही वयोगटातील मुलांना होऊ शकतो. मात्र लहान बाळ, अकाली जन्मलेली मुले आणि रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या मुलांमध्ये न्यूमोनिया गंभीर होण्याचा धोका अधिक असतो. उपचार घेण्यास उशीर झाल्यास शरीरातील पाण्याची कमतरता होऊ शकते. तसंच रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी होऊ शकते किंवा संसर्ग शरीरात अधिक पसरू शकतो. त्यामुळे वेळीच उपचार घेणे गरजेचे आहे.

मुलांमध्ये ही लक्षणं दिसल्यास सावध व्हा

मुलाला अनेक दिवसांपासून खोकला असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. यासोबतच ही लक्षणं दिसत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका.

  • ताप येणं

  • नेहमीपेक्षा वेगाने श्वास घेणं

  • श्वास घेण्यास त्रास होणं

  • असामान्य थकवा जाणवणं

  • दूध किंवा अन्न कमी घेणं

  • नेहमीपेक्षा जास्त आळशी होणं

  • जेवण्यास नकार देणं

लहान बाळांमध्ये न्यूमोनियाची लक्षणं काहीशी वेगळी दिसू शकतात. बाळ श्वास घेताना छातीत घरघर किंवा वेगळ्या प्रकारचा आवाज येत असेल तर त्याकडे लक्ष द्यावं. तसंच प्रत्येक श्वास घेताना बरगड्यांमधील त्वचा आत ओढली जात असेल तर हे गंभीर लक्षण असू शकते. अशी लक्षणे दिसल्यास उपचार घेण्यास उशीर करू नये.

विषाणू आणि जिवाणूंमुळे होऊ शकतो न्यूमोनिया

न्यूमोनिया हा विषाणू, जिवाणू किंवा क्वचित बुरशीच्या संसर्गामुळे होऊ शकतो. न्यूमोनिया नेमका कशामुळे झाला आहे, हे समजल्यानंतर डॉक्टर त्यानुसार उपचार ठरवतात. जिवाणूंमुळे झालेल्या न्यूमोनियामध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याने अँटीबायोटीक्स औषधांचा वापर केला जाऊ शकतो. तर विषाणूंमुळे झालेल्या न्यूमोनियामध्ये मुलाला पुरेसे द्रवपदार्थ देणे, ताप नियंत्रणात ठेवणे आणि पुरेशी विश्रांती देणे यावर भर दिला जातो.

गंभीर त्रास असल्यास रुग्णालयात दाखल करण्याची गरज

मुलाला श्वास घेण्यास गंभीर त्रास होत असेल किंवा रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली असेल तर मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासू शकते. अशा वेळी मुलाला पुरेसे ऑक्सिजन देणे आणि काही दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवणे आवश्यक ठरू शकते. त्यामुळे पालकांनी डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावं.

लसीकरणामुळे न्यूमोनियापासून बचाव

न्यूमोनियापासून बचाव करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, मुलाचं लसीकरण वेळेत करणं गरजेचं आहे. न्यूमोकोकल लस मुलाच्या वयानुसार आणि लसीकरणाच्या वेळापत्रकानुसार देण्यात यावी. मुलाचं लसीकरण झालं नसल्यास पालकांनी डॉक्टरांशी संपर्क साधून योग्य लसीकरणाचं वेळापत्रक जाणून घ्यावं.

लक्षणं दिसल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या

मुलाला सतत खोकला, ताप, श्वास घेण्यास त्रास किंवा नेहमीपेक्षा जास्त सुस्ती जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. अशा वेळी त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा. मुलांच्या फुफ्फुसांच्या आरोग्याशी संबंधित असामान्य लक्षणांची वेळीच दखल घेणे आणि योग्य उपचार करणं अत्यंत गरजेचं आहे.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पितृपक्षात सोनं खरेदी करावे की नाही? जाणून घ्या

Bank Scam : ६५० कोटींचा बँक घोटाळा! डान्सरवर दरमहा उडवायचा १० लाख रुपये; CBI ने 'या' मास्टरमाइंडला ठोकल्या बेड्या

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्र्यांकडून एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य

Maharashtra Fort : शिखरावरचं रहस्यमय शिल्प! दुरून माणसासारखा दिसतो 'हा' किल्ला

ODI Ranking : कोहलीचा 'विराट' पराक्रम! वनडे रँकिंगमध्ये मोठी झेप, शुभमन गिलचं 'सिंहासन' धोक्यात

SCROLL FOR NEXT