आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अचानक छातीत वेदना झाल्या तर प्रत्येकजण घाबरतो. काही वेळा हा त्रास हृदयाशी संबंधित वाटतो, पण नेहमीच तसं असतं असं नाही. अनेक प्रकरणांमध्ये हा त्रास साध्या गॅसच्या समस्येमुळेही होऊ शकतो, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. चुकीचा आहार, पटकन खाणं किंवा पचनाशी संबंधित त्रास यामुळे शरीरात गॅस अडकतो आणि तो छातीत दाब, जडपणा किंवा वेदना निर्माण करू शकतो.
पुण्यातील डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील अंतर्गत औषध विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. स्वप्नील पाटील यांच्या मते, अशा प्रकारचा गॅसचा त्रास जरी कधी कधी हार्ट अटॅकसारखा वाटत असला तरी बहुतांश वेळा तो धोकादायक नसतो. हा त्रास घरगुती उपायांनी कमी करता येतो. मात्र योग्य वेळी लक्षणं ओळखणं महत्त्वाचं असतं.
गॅसमुळे होणारा छातीतला त्रास नेमका कसा जाणवतो, याबाबतही डॉक्टरांनी माहिती दिलीये. काही लोकांना छातीत अचानक टोचल्यासारखी वेदना होते, तर काहींना छातीच्या मध्यभागी जडपणा किंवा दाब जाणवतो. कधी पोटात वरच्या भागात सुरू झालेला त्रास छातीकडे पसरतो आणि त्यामुळे हार्टशी काही समस्या असल्याचा संशय येतो. जास्त वेगाने जेवण करणं, जास्त तिखट किंवा तेलकट पदार्थ खाणं, किंवा आम्लपित्त (ॲसिड रिफ्लक्स) यामुळेही हा त्रास वाढू शकतो.
अशा परिस्थितीत काही घरगुती उपाय खूप उपयोगी ठरू शकतात असं डॉक्टर सांगतात. त्यात पहिला उपाय म्हणजे ओव्याचं कोमट पाणी. ओव्यामध्ये असलेला थायमॉल पचनक्रिया सुधारतो आणि आतड्यांतील गॅस बाहेर पडायला मदत करतो. कोमट पाण्यासोबत घेतल्यास पोट आणि छातीतील दाब कमी होतो.
दुसरा उपाय म्हणजे लिंबू पाणी. कोमट लिंबू पाणी पचन सुधारतं आणि आम्लपित्त कमी करण्यास मदत करतं. हे शरीरातील अन्नाची क्रिया सुधारून फुगवटा आणि जडपणा कमी करतं.
तिसरा उपाय म्हणजे हर्बल चहा. पुदिना किंवा कॅमोमाइल चहा घेतल्यास पचनसंस्थेवर सकारात्मक परिणाम होतो. पुदिना आतड्यांच्या स्नायूंना आराम देतो, तर कॅमोमाइल जळजळ कमी करण्यास मदत करतो.
चौथा प्रभावी उपाय म्हणजे आलं. आलं हे पचन सुधारण्यासाठी खूप उपयुक्त मानलं जातं. संशोधनानुसार आलं पोट रिकामं होण्याची प्रक्रिया सुधारतं आणि गॅस कमी करतं. आलं चहा, कच्चं आलं किंवा जेवणात आलं वापरल्याने काही मिनिटांतही आराम मिळू शकतो.
पाचवा उपाय म्हणजे बडीशेप. जेवणानंतर बडीशेप चघळल्याने पचन सुधारतं आणि गॅस कमी होतो. बडीशेप नैसर्गिक अँटासिडप्रमाणे काम करतं आणि छातीत जाणवणारा दाब हलका करतं.
एकूणच छातीत होणारा प्रत्येक त्रास हृदयाशी संबंधित नसतो. पण तरीही लक्षणांकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही. योग्य आहार, वेळेवर खाण्याच्या सवयी आणि सोपे घरगुती उपाय यामुळे गॅसचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकतो, असं डॉक्टरांचं मत आहे.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.