श्वसनासंदर्भातील आजार हे फार धोकादायक मानले जातात. यातीलच एक आजार म्हणजे अस्थमा. अस्थमा हा एक श्वसनासंदर्भातील आजार असून लहान मुलांमध्ये देखील याचं प्रमाण आढळतं. लहान मुलांमध्ये आढळणाऱ्या अस्थमाला बालदमा म्हटलं जातं. या समस्येमध्ये फुफ्फुसातील हवा वाहून नेणाऱ्या नलिकांना सूज येते आणि त्या अरुंद होतात. यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो.
अस्थमाच्या समस्येमध्ये श्वास घेताना घरघर होणं आणि छातीत जडपणा वाटणं अशा समस्या दिसून येतात. अस्थमा होण्याची अनेक कारणे आणि ट्रिगर असू शकतात. अस्थमा होण्यामागे कोणती नेमकी कारणं आहेत ती जाणून घेऊया.
जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणाला हा त्रास असेल तर हा त्रास तुम्हालाही होऊ शकतो. यामध्ये आई-वडील किंवा भावंडांना अस्थमा असेल, तर तुम्हाला हा आजार होण्याची शक्यता वाढते. काही विशिष्ट जनुकीय घटक अस्थमाच्या विकासाशी संबंधित असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे. हे घटक श्वसनमार्गाची संवेदनशीलता आणि प्रतिकारशक्तीवर परिणाम करतात.
कौटुंबिक इतिहासासह अनेकांना एलर्जीमुळे देखील अस्थमाचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक लोकांना विशिष्ट एलर्जींमुळे हा त्रास होऊ शकतो. यामध्ये ज्यावेळी शरीर हवेतील काही हानिकारक नसलेल्या कणांना (एलर्जी कारक) धोकादायक समजून प्रतिक्रिया देतं, तेव्हा अस्थमाची लक्षणं दिसून येतात. यामध्ये परागकण, धुळीचे कण, पाळीव प्राण्यांची त्वचा आणि केस, बुरशी यांचा समावेश आहे.
सध्या प्रदूषण वाढलं असून हवेतील प्रदूषण हा देखील अस्थमा होण्यासाठी एक महत्त्वाचा घटक मानला जातो. प्रदूषित हवा, धूर आणि इतर त्रासदायक घटक श्वसनमार्गाला उत्तेजित करू शकतात. यामुळे अस्थमाची लक्षणं दिसून येतात. यामध्ये सिगारेटचा धूर, गाडी आणि कारखान्यांचं प्रदूषण, रासायनिक फवारण्या यांचा समावेश आहे.
इन्फेक्शन हे देखील अस्थमा होण्याचं एक गंभीर कारण असू शकतं. लहानपणी झालेलं गंभीर इन्फेक्शन, जसं की रेस्पिरेटरी सिन्सिशिअल व्हायरस (RSV) किंवा सतत होणारा ब्राँकायटिस, या तक्रारी अस्थमा होण्याचा धोका वाढवू शकतात. प्रौढ व्यक्तींमध्ये सर्दी किंवा ताप यांसारख्या सामान्य श्वसन संसर्गामुळे अस्थमा होण्याचा धोका वाढण्याची शक्यता असते.
व्यायाम करणं हे उत्तम मानलं जातं. मात्र काही व्यक्तींना थंड किंवा कोरड्या हवेत व्यायाम केल्यावर अस्थमाची लक्षणं जाणवू शकतात. यामध्ये व्यायामामुळे श्वसनमार्ग थंड आणि कोरडा पडू लागते. परिणामी व्यक्तीला श्वास घेण्यामध्ये त्रास जाणवतो. मात्र व्यायाम हा प्रत्येक रूग्णासाठी धोकादायक ठरत नाही. मात्र रूग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन व्यायाम करावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.