आजच्या काळात कॅन्सरवरील उपचारांमध्ये औषधं, शस्त्रक्रिया आणि रेडिएशन या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मात्र हे उपचार करत असताना रुग्णांच्या मानसिक आरोग्याकडेही तितकंच लक्ष देणं आवश्यक असल्याचं एका नव्या अभ्यासातून समोर आलंय. निदान आणि उपचारांच्या काळात मोठ्या प्रमाणावर कॅन्सरचे रुग्ण भावनिक तणावाचा सामना करत असल्याचं या संशोधनात दिसून आलंय. तज्ज्ञांच्या मते, समुपदेशन आणि काळजीमुळे रुग्णांच्या मानसिक स्थितीत सुधारणा होऊ शकते.
अमेरिकेत नुकत्याच पार पडलेल्या अमेरिकन सोसायटी ऑफ क्लिनिकल ऑन्कोलॉजी (ASCO) च्या वार्षिक कॉन्फरन्समध्ये शहरातील कॅन्सरतज्ज्ञांनी स्टडी सादर केला. पश्चिम भारतातील MOC Cancer Care केंद्रांमध्ये करण्यात आलेल्या या बहुकेंद्रीय अभ्यासात एप्रिल ते डिसेंबर 2025 या कालावधीत 2,273 प्रौढ कॅन्सरग्रस्त रुग्णांचा समावेश करण्यात आला होता.
या अभ्यासात NCCN (National Comprehensive Cancer Network) Distress Thermometer या स्क्रिनींग टूलचा वापर करण्यात आला. हे टून 0 ते 10 या श्रेणीत रुग्णांच्या भावनिक आणि मानसिक तणावाचं मोजमाप करतं.
अभ्यासाच्या पहिल्या मूल्यांकनात सुमारे 57 टक्के रुग्ण ‘उच्च तणाव’ गटात असल्याचं आढळलं. MOC Cancer Care च्या मालाड आणि बोरिवली केंद्रांतील डॉ. प्रदीप केंद्रे यांनी सांगितलं की, 60 वर्षांखालील रुग्ण आणि कॅन्सरच्या चौथ्या स्टेजमधील रुग्णांमध्ये सर्वाधिक इमोशनल स्ट्रेस दिसून आला. निदानाच्या वेळी रुग्णांचा सरासरी स्ट्रेस स्तर 10 पैकी 5.2 इतका होता.
भारतातील कॅन्सरच्या उपचारांमध्ये शारीरिक उपचारांवर भर दिला जातो, परंतु मानसिक आरोग्याची काळजी अनेकदा दुर्लक्षित राहते. या पार्श्वभूमीवर या अभ्यासाचे निष्कर्ष महत्त्वाचे मानले जातायत.
महाराष्ट्रातील या अभ्यासात सहभागी रुग्णांनी वेदना, थकवा, चिंता, आर्थिक ताण आणि स्वतःची काळजी घेण्यात येणाऱ्या अडचणी यांसारख्या अनेक समस्यांचा उल्लेख केला. यापूर्वी ऑक्टोबर 2024 मध्ये प्रसिद्ध झालेल्या Indian Journal of Cancer मधील एका अभ्यासात केरळमधील थालास्सेरीमधील Malabar Cancer Centre मधील डॉक्टरांनी 348 रुग्णांचा अभ्यास केला होता. त्यात 39.9 टक्के रुग्णांमध्ये नव्या रुग्णांच्या कॉऊंसिलिंग करताना गंभीर मानसिक तणाव आढळून आला होता.
त्या अभ्यासानुसार, गंभीर स्ट्रेस असलेल्या 139 रुग्णांपैकी 47.5 टक्के रुग्णांनी तणावाचं कारण मानसिक आणि सामाजिक अडचणी असल्याचं सांगितलं. तर 25.9 टक्के रुग्णांनी शारीरिक त्याचप्रमाणे मानसिक-सामाजिक कारणं जबाबदार असल्याचं नमूद केलं. उर्वरित 26.6 टक्के रुग्णांनी केवळ शारीरिक कारणांमुळे तणाव असल्याचं सांगितलं होतं.
MOC Cancer Care केंद्रांमध्ये काऊंसिलिंग आणि इतर उपाययोजना केल्यानंतर पुन्हा करण्यात आलेल्या मूल्यांकनात सकारात्मक बदल दिसून आला. रुग्णांचा सरासरी स्ट्रेस स्तर 5.2 वरून 3.5 पर्यंत खाली आला होता. याचाच अर्थ रूग्णांच्या स्ट्रेसमध्ये सुमारे 30 टक्क्यांची घट झाली. अभ्यासातील जवळपास निम्म्या रुग्णांनी त्यांच्या इमोशनल हेल्थमध्यये सुधारणा झाल्याचं सांगितलं.
MOC Cancer Care चे संभाजीनगरमधील डॉ. प्रकाश देवडे यांनी सांगितलं की, कॅन्सरवरील उपचार केवळ औषधांपुरते मर्यादित नसतात. पोषणाचं मूल्यमापन, मानसिक तणावाची तपासणी, समुपदेशन आणि जीवनमानावर नियमित लक्ष ठेवणं यांसारख्या साध्या उपायांमुळे रुग्णांना उपचार अधिक चांगल्या प्रकारे सहन करता येतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.