चेहऱ्याचं सौंदर्य खुलवण्यात भुवयांचा मोठा वाटा असतो. पण काही जणांच्या भुवयांवरील केस हळूहळू कमी होऊ लागतात. सुरुवातीला भुवईच्या टोकाकडील केस विरळ होतात किंवा मधूनमधून केस गायब झाल्यासारखे दिसतात. अनेकांना वाटतं की, जास्त प्रमाणात थ्रेडिंग केल्यामुळे किंवा मेकअपमुळे असं होत असेल. मात्र भुवयांवरील केस सतत कमी होत असतील तर त्यामागे केवळ सौंदर्याचा प्रश्न नसून काही आरोग्याशी संबंधित कारणंही असू शकतात.
डॉक्टरांच्या मते, भुवयांच्या बाहेरील टोकाकडील केस गळणं हे थायरॉईडच्या समस्येचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं. यालाच वैद्यकीय भाषेत 'क्वीन अॅन साइन' किंवा 'हर्टोगे साइन' असं म्हणतात. थायरॉईड ग्रंथी कमी किंवा जास्त प्रमाणात कार्य करत असेल तर त्याचा परिणाम केसांच्या वाढीवर होतो. विशेषतः भुवयांच्या बाहेरील एक-तृतीयांश भागातील केस सर्वात आधी विरळ होऊ लागतात. यासोबतच सतत थकवा जाणवणं, मूडमध्ये बदल होणं किंवा अचानक वजन वाढणं किंवा कमी होणं अशी लक्षणंही दिसत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन रक्त तपासणी करून घेणं गरजेचं आहे.
फक्त पोटभर खाल्लं म्हणजे शरीराला सर्व पोषण मिळतं असं नाही. केसांच्या चांगल्या वाढीसाठी लोह (Iron), बायोटीन, प्रोटीन आणि व्हिटॅमिन डी यांची पुरेशी मात्रा आवश्यक असते. या घटकांची कमतरता असल्यास शरीर आधी महत्त्वाच्या अवयवांकडे लक्ष देतं आणि केसांची वाढ मागे पडते. त्यामुळे वारंवार जेवण टाळणं, जंक फूड किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ जास्त खाणं किंवा पचनाशी संबंधित त्रास असल्याने पोषक घटक नीट शोषले जात नसतील तर त्याचाही परिणाम भुवयांवर दिसू शकतो.
एक्झिमा, सेबोरिक डर्माटायटिस किंवा सोरायसिस यांसारख्या त्वचेच्या समस्यांमुळे भुवयांच्या आसपास सूज किंवा दाह निर्माण होतो. त्यामुळे केस गळू शकतात. काही वेळा भुवयांच्या भागात खाज येणं, लालसरपणा किंवा कोंडा दिसतो. तर काही जणांमध्ये कोणतीही स्पष्ट लक्षणं नसतानाही केस हळूहळू कमी होतात. नवीन ब्युटी प्रॉडक्ट वापरल्यानंतर असा त्रास सुरू झाला असेल तर काही दिवस ते वापरणं थांबवून त्वचेला विश्रांती द्यावी.
अॅलोपेशिया एरियाटा (Alopecia Areata) हा एक ऑटोइम्यून आजार आहे. यात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती केसांच्या मुळांवरच हल्ला करते. हा आजार फक्त डोक्यावरील केसांपुरता मर्यादित नसून भुवयांवरही परिणाम करू शकतो. अनेकदा एका रात्रीत किंवा काही दिवसांत भुवयांवरचे केस गळू केस गळू लागतात. हा त्रास अनपेक्षित असला तरी योग्य उपचारांनी अनेक रुग्णांमध्ये नियंत्रणात आणता येतो.
महिलांमध्ये हार्मोन्समधील बदलांमुळेही भुवयांवरील केस कमी होऊ शकतात. रजोनिवृत्ती (मेनोपॉज), गर्भधारणा, पीसीओएस (PCOS) किंवा गर्भनिरोधक गोळ्या सुरू करणं किंवा बंद करणं यामुळे हार्मोन्सचं संतुलन बिघडू शकते. त्याचा परिणाम केसांच्या वाढीवर होतो. विशेष म्हणजे हा बदल झाल्यानंतर काही महिन्यांनी केस गळण्यास सुरुवात होऊ शकते.
मानसिक, भावनिक किंवा शारीरिक ताण वाढला की शरीर काही कमी महत्त्वाच्या प्रक्रिया तात्पुरत्या थांबवते. त्यामध्ये केसांची वाढही असते. काही लोकांमध्ये ताण इतका वाढतो की, ते नकळत स्वतःच्या भुवया किंवा पापण्यांचे केस उपटू लागतात. या मानसिक आरोग्याशी संबंधित आजाराला ट्रायकोटिलोमेनिया (Trichotillomania) असं म्हणतात.
वय वाढत गेल्यानंतर केसांच्या मुळांची ताकद कमी होत जाते आणि नवीन केस येण्याचा वेगही मंदावतो. ४० वर्षांनंतर अनेकांच्या भुवया पूर्वीपेक्षा विरळ दिसू लागतात. हा नैसर्गिक बदल असला तरी सौम्य स्वरूपाचं आयब्रो सिरम किंवा पोषण देणारे तेल वापरल्यास केसांचं आरोग्य टिकवण्यास मदत होऊ शकते.
भुवयांच्या भागात बुरशीजन्य किंवा जीवाणूजन्य संसर्ग झाला तरी केस गळू शकतात. भुवयांच्या आसपास लालसरपणा, सूज, वेदना किंवा पू दिसत असेल तर विलंब न करता डॉक्टरांकडे जावं. वेळेत उपचार केल्यास समस्या वाढण्यापासून रोखता येते.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.