Surabhi Jayashree Jagdish
रोज रात्री झोपेतून उठून खाण्याची तीव्र इच्छा होत असेल तर ते नाईट ईटिंग सिंड्रोम या समस्येचं लक्षण असू शकतं. हा खाण्याशी संबंधित एक विकार असून व्यक्तीला रात्री वारंवार भूक लागते आणि काहीतरी खाल्ल्याशिवाय पुन्हा झोप लागत नाही.
या समस्येमध्ये अनेकांना रात्री गोड पदार्थ, चॉकलेट, बिस्किटं, चिप्स किंवा फास्ट फूड खाण्याची तीव्र इच्छा होते. त्यामुळे रात्री आवश्यकतेपेक्षा जास्त कॅलरीचं सेवन होण्याची शक्यता वाढते. दीर्घकाळ अशी सवय राहिल्यास वजन वाढणं आणि इतर आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.
रात्री वारंवार खाण्यासाठी जाग आल्यामुळे सलग आणि पुरेशी झोप मिळत नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी भूक कमी लागते आणि अनेकजण नाश्ता टाळतात. अशा बदलामुळे शरीराचं नैसर्गिक जैविक घड्याळ आणि खाण्याची वेळ विस्कळीत होऊ शकतं.
काही संशोधनांमध्ये या विकाराचा संबंध कौटुंबिक इतिहास किंवा आनुवंशिक घटकांशी असल्याचं आढळलंय. कुटुंबातील इतर सदस्यांनाही अशी समस्या असल्यास धोका काही प्रमाणात वाढू शकतो. मात्र प्रत्येक व्यक्तीत यामागचं कारण वेगळं असू शकतं.
मानसिक ताण, चिंता आणि भावनिक अस्थिरता यांचा खाण्याच्या सवयींवर थेट परिणाम होऊ शकतो. तणावामुळे काही लोकांना रात्री वारंवार खाण्याची इच्छा निर्माण होते. त्यामुळे ताण-तणाव नियंत्रित ठेवणं ही या समस्येवर मात करण्यासाठी महत्त्वाची बाब आहे.
दिवसभर कमी खाणं, जेवणाच्या वेळा चुकवणं किंवा दीर्घकाळ उपाशी राहणं यामुळे रात्री अचानक तीव्र भूक लागू शकते. अशा वेळी शरीर ऊर्जा भरून काढण्यासाठी जास्त अन्नाची मागणी करतं. त्यामुळे दिवसातील जेवणाच्या वेळा तुम्ही पाळल्या पाहिजेत.
रोज रात्री भूक लागून झोप मोडत असेल तर स्वतः निदान न करता डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य ठरतं. गरजेनुसार डॉक्टर कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी (CBT), तणाव नियंत्रणासाठी मार्गदर्शन किंवा काही प्रकरणांमध्ये औषधं सुचवू शकतात.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.