उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी डॉक्टरांनी दिलेली औषधं नियमित घेणं खूप महत्त्वाचं असतं. कारण रक्तदाब सतत वाढलेला राहिला तर त्याचा हृदय, मेंदू आणि किडनीवर गंभीर परिणाम होऊ शकतो. मात्र अनेक जण औषधं वेळेवर घेत असूनही रक्तदाब अपेक्षेप्रमाणे कमी होत नाही, अशी तक्रार करतात.
असं झालं की, अनेकांना वाटतं की औषधांचा काहीच उपयोग होत नाही. पण प्रत्यक्षात औषधांपेक्षा आपल्या काही रोजच्या सवयी, आहारातील चुका किंवा शरीरातील इतर काही आजार यामुळे औषधांचा परिणाम कमी होऊ शकतो. काही वेळा औषध घेण्याची वेळही महत्त्वाची ठरते. रक्तदाबाची औषधं घेत असूनही बीपी नियंत्रणात का येत नाही यामागची ही पाच महत्त्वाची कारणं जाणून घेऊया.
आपल्यापैकी अनेकांना वाटतं की आपण फारसं मीठ खात नाही. पण प्रत्यक्षात रोजच्या आहारात अनेक पदार्थांमधून शरीरात भरपूर मीठ जात असतं. पॅकेज्ड स्नॅक्स, चिप्स, बिस्किटं, रेडी-टू-ईट पदार्थ, डबाबंद सूप, हॉटेलमधील जेवण आणि काही भाज्यांमधूनही सोडियमचं प्रमाण जास्त मिळू शकतं.
तज्ज्ञांच्या मते, एका दिवसात सुमारे ५ ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नये. मात्र बहुतांश लोक नकळत यापेक्षा जास्त मीठ खातात.
खरेदी करताना अन्नपदार्थांवरील लेबल वाचून त्यातील सोडियमचं प्रमाण तपासा.
शक्य तितकं ताजं आणि घरचं अन्न खा. प्रक्रिया केलेले (प्रोसेस्ड) पदार्थ कमी करा.
जेवताना वरून मीठ घालणं टाळा.
धूम्रपान करत असाल तर ते सोडण्याचा प्रयत्न करा. धूम्रपानामुळे चव कमी जाणवू लागते आणि त्यामुळे
अनेकदा जास्त मीठ वापरलं जातं.
केळी, संत्री, पालक, टोमॅटो यांसारखी पोटॅशियमयुक्त फळं आणि भाज्या आहारात वाढवा. त्यामुळे शरीरातील सोडियमचं संतुलन राखण्यास मदत होते.
दररोज एक-दोन कप चहा किंवा कॉफी पिणं बहुतांश लोकांसाठी सुरक्षित मानलं जातं. पण दिवसभरात वारंवार कॉफी, कडक चहा, एनर्जी ड्रिंक्स किंवा कोल्ड ड्रिंक्स घेत असाल तर काही लोकांमध्ये त्यामुळे रक्तदाब अचानक वाढू शकतो. विशेषतः कॅफिनची संवेदनशीलता जास्त असलेल्या व्यक्तींमध्ये याचा परिणाम अधिक दिसून येतो.
दिवसातील चहा-कॉफीचं प्रमाण कमी करा.
काही दिवस रक्तदाब तपासत राहा आणि त्यात फरक जाणवतो का ते पाहा.
दुपारनंतर हर्बल टी किंवा डिकॅफ कॉफीचा पर्याय निवडू शकता.
तुम्ही औषधं नियमित घेत असाल, डॉक्टरांनी सांगितलेल्या सूचना पाळत असाल, तरीही रक्तदाब कमी होत नसेल तर त्यामागे दुसरा एखादा आजार असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
स्लीप अॅप्निया (झोपेत श्वास अडखळण्याचा त्रास)
थायरॉईडचे विकार
किडनीचे आजार
अॅड्रिनल ग्रंथींचे विकार
हे आजार सुरुवातीला सहज लक्षात येत नाहीत. पण ते रक्तदाब वाढवू शकतात आणि औषधांचा परिणामही कमी करू शकतात. त्यामुळे गरज भासल्यास डॉक्टर काही तपासण्या करण्याचा सल्ला देऊ शकतात.
औषधं नियमित घेणं जितकं आवश्यक आहे, तितकंच ती योग्य वेळी घेणंही महत्त्वाचं असतं. काही जण दिवसातील सगळी औषधं एकाच वेळी घेतात. त्यामुळे दिवसभर औषधांचा परिणाम समान राहीलच असं नाही. काही वेळा औषधांचा प्रभाव कमी-जास्त होऊ शकतो.
काही वर्षांपूर्वी सुरू केलेली औषधं आजही तितकीच परिणामकारक असतीलच असं नाही. वय वाढणं, वजन वाढणं, जीवनशैलीतील बदल किंवा इतर काही आजार यामुळे औषधांचा परिणाम बदलू शकतो. अशा वेळी डॉक्टर औषधांचा डोस वाढवू शकतात किंवा आणखी एक औषध सुरू करू शकतात.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.