अमेरिकेच्या फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनने (FDA) रिवोल्यूशन मेडिसिन्सच्या ‘रासोंक’ या नव्या औषधाला मेटास्टॅटिक पॅन्क्रियाटिक कॅन्सर म्हणजेच शरीराच्या इतर भागांमध्ये पसरलेल्या स्वादुपिंडाच्या कॅन्सरच्या उपचारासाठी मंजुरी दिलीये. या औषधामुळे कॅन्सरच्या पुढच्या टप्प्यात असलेल्या रुग्णांचा जगण्याचा कालावधी जवळपास दुप्पट होण्यास मदत झाल्याचं एका मोठ्या चाचणीत समोर आलंय.
‘रासोंक’ ही दिवसातून फक्त एकदा घ्यायची गोळी आहे. यापूर्वी उपचार घेऊन झालेले किंवा ज्यांना केमोथेरपी घेणं शक्य नाही अशा रुग्णांसाठी हे औषध वापरता येणार आहे. मात्र या औषधाची किंमतही अधिक आहे. कंपनीने 30 दिवसांच्या औषधांच्या पुरवठ्यासाठी 39,800 डॉलर म्हणजेच सध्याच्या दरानुसार जवळपास 38 लाख रुपये किंमत ठरवलीये. किंमत जास्त असली तरी रुग्णांना आर्थिक मदत मिळावी यासाठी कंपनीने काही योजना जाहीर केल्या आहेत.
कॅलिफोर्नियातील फुलर्टनमध्ये राहणाऱ्या 88 वर्षांच्या बारबरा एंडेस यांनी एक वर्ष केमोथेरपी घेतल्यानंतर जुलै महिन्यात ‘रासोंक’ घेण्यास सुरुवात केली. औषध सुरू केल्यानंतर त्यांना त्यांची दररोजची कामं पुन्हा करता आली. त्याचप्रमाणे सतत होणारी मळमळ आणि थकवाही मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचं त्यांनी सांगितलं.
हे औषध आता कॅन्सरने ग्रस्त असलेल्या हजारो रुग्णांना उपलब्ध होणार असल्याने ही मोठी आशेची गोष्ट असल्याचं एंडेस यांनी म्हटलंय. त्यांच्या मते, हे औषध एखाद्या वरदानापेक्षा कमी नाहीये.
‘रासोंक’ला FDAच्या नव्या एक्सपेडाइटेड रिव्ह्यू प्रक्रियेतून मंजुरी मिळालीये. या प्रक्रियेमुळे औषधांच्या मंजुरीसाठी लागणारा नेहमीचा 10 ते 12 महिन्यांचा कालावधी कमी होऊन साधारण 1 ते 2 महिन्यांपर्यंत येतो.
रिवोल्यूशन मेडिसिन्सचे सीईओ मार्क गोल्डस्मिथ यांनी सांगितलं की, पॅन्क्रियाटिक कॅन्सरवर म्हणजेच RAS-driven कॅन्सरवर कंपनीने 10 वर्षांपेक्षा जास्त काळ केलेल्या संशोधनाचं हे मोठं यश आहे. वैद्यकीय क्षेत्रासमोर असलेल्या अत्यंत कठीण आव्हानांपैकी ही एक समस्या होती.
RBC कॅपिटल मार्केट्सच्या अंदाजानुसार, या औषधाला वेगाने मंजुरी मिळाल्यामुळे आणि आधीपासूनच एक्सपेंडेड ॲक्सेस प्रोग्राममध्ये सहभागी असलेल्या 2,000 हून अधिक रुग्णांमुळे अमेरिकेत तिसऱ्या तिमाहीत पॅन्क्रियाटिक कॅन्सरच्या उपचारातून कंपनीला सुमारे 28 दशलक्ष डॉलरची कमाई होऊ शकते.
चौथ्या तिमाहीत ही विक्री 148 दशलक्ष डॉलरपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. तर पुढील काळात ‘रासोंक’ची जगभरातील वार्षिक विक्री तब्बल 11.5 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचू शकते, असा विश्लेषकांचा अंदाज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.