महिलांमध्ये वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका
स्तनांमध्ये होणारे बदल आणि गाठींकडे दुर्लक्ष करू नका
व्यायामाचा अभाव आणि वाढते वजन आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक
स्तनाचा कर्करोग म्हणजेच ब्रेस्ट कॅन्सर हा महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगांपैकी एक महत्त्वाचा प्रकार आहे. बदलती जीवनशैली, वाढते वय, अनुवंशिकता आणि काही हार्मोनल घटकांमुळे ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढू शकतो. अनेकदा दैनंदिन जीवनातील काही सवयी आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकतात. महिलांची एक छोटी चूक थेट ब्रेस्ट कॅन्सरला कारणीभूत ठरू शकते, त्यामुळे शरीरातील कोणत्याही बदलांकडे दुर्लक्ष करू नका.
मद्यपान
मद्यपानाचा आणि ब्रेस्ट कॅन्सरच्या वाढत्या धोक्याचा संबंध आढळला आहे. मद्यपानामुळे शरीरातील इस्ट्रोजेनसारख्या हार्मोन्सच्या पातळीवर परिणाम होऊ शकतो. नियमित किंवा अधिक प्रमाणात मद्यपान केल्यास स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो.
शारीरिक हालचालींकडे दुर्लक्ष करणे
दिवसभर एकाच जागी बसून राहणे, व्यायाम न करणे आणि शारीरिक हालचाली कमी असणे याचा आरोग्यावर परिणाम होतो. शारीरिकदृष्ट्या सक्रिय नसलेल्या महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढू शकतो. त्यामुळे रोज चालणे, योगासने, सायकलिंग किंवा इतर व्यायामासाठी वेळ काढावा.
वाढते वजन
विशेषतः रजोनिवृत्तीनंतर (Menopause) महिलांचे वजन वाढल्यास ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढू शकतो. शरीरातील अतिरिक्त चरबीमुळे इस्ट्रोजेनच्या पातळीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि वजन नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे आहे.
धूम्रपान
धूम्रपानामुळे शरीरातील पेशींना नुकसान पोहोचू शकते आणि अनेक प्रकारच्या कर्करोगांचा धोका वाढतो. त्यामुळे सिगारेट, तंबाखू आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहणे आवश्यक आहे.
कुटुंबाचा कर्करोगाच्या इतिहास
आई, बहीण किंवा मुलगी यांसारख्या जवळच्या नातेवाइकांना ब्रेस्ट कॅन्सर झाला असल्यास स्वतःचा धोका वाढू शकतो. त्यामुळे कुटुंबात ब्रेस्ट किंवा ओव्हेरियन कॅन्सरचा इतिहास असल्यास डॉक्टरांना त्याची माहिती द्यावी आणि गरजेनुसार जनुकीय तपासणी करून घ्यावी.
स्तनांच्या तपासणीकडे दुर्लक्ष करणे
स्तनांमध्ये होणारे बदल वेळेवर लक्षात न घेणे ही गंभीर चूक ठरू शकते. स्तनात गाठ जाणवणे, स्तनाग्रातून रक्तमिश्रित स्त्राव येणे, स्तनाच्या आकारात बदल होणे, त्वचेवर खळ्या पडणे किंवा स्तनाग्र आत ओढले जाणे अशी लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करू नये.
स्तनामध्ये नवीन गाठ किंवा सूज जाणवणे.
स्तनाच्या आकारात किंवा त्वचेच्या रंगात बदल होणे.
स्तनाग्रातून रक्तमिश्रित किंवा असामान्य स्त्राव येणे.
स्तनाच्या त्वचेवर खळ्या पडणे किंवा संत्र्याच्या सालीसारखा पोत दिसणे.
स्तनाग्र आतल्या बाजूला ओढले जाणे.
काखेत गाठ किंवा सूज जाणवणे.
नियमित व्यायाम आणि शारीरिक हालचाली कराव्यात
वजन नियंत्रणात ठेवावे.
मद्यपान आणि धूम्रपान टाळावे.
संतुलित आणि पौष्टिक आहार घ्यावा.
स्तनांमध्ये होणाऱ्या बदलांकडे लक्ष द्यावे.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मॅमोग्राफी आणि इतर तपासण्या कराव्यात.
कुटुंबातील कर्करोगाचा इतिहास असल्यास डॉक्टरांना सांगावे.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.