Breast Cancer: ब्रेस्ट कॅन्सर बरा झाल्यानंतरही पुन्हा होऊ शकतो आजार? उपचारांनंतरही महिलांनी या ५ गोष्टी लक्षात ठेवाव्यात

Breast Cancer Treatment: ब्रेस्ट कॅन्सरचे उपचार पूर्ण झाल्यानंतरही आजार पुन्हा होण्याची शक्यता असते का? कॅन्सरचा धोका, नियमित तपासण्या, मॅमोग्राफी आणि उपचारांनंतर घ्यायची काळजी याबाबत डॉक्टरांनी दिलेला महत्त्वाचा सल्ला जाणून घ्या.
Breast Cancer Treatment
Breast Cancer Treatmentsaam tv
Published On: 

ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचं समजल्यानंतर महिलांना मोठा धक्का बसतो. त्यानंतर शस्त्रक्रिया, औषधोपचार आणि इतर उपचारांचा प्रवास सुरू होतो. हा सगळा प्रवास पूर्ण झाल्यानंतर रुग्णाला मोठा दिलासा मिळतो. तपासण्यांचे रिपोर्टही चांगले येऊ लागतात. हळूहळू महिला पुन्हा आपल्या कामाला सुरुवात करतात. घर, कुटुंब आणि भविष्यातील योजनांकडे लक्ष देऊ लागतात. मात्र अशा वेळी अनेक महिलांच्या मनात एक प्रश्न असतो. तो म्हणजे ब्रेस्ट कॅन्सरचे उपचार पूर्ण झाले म्हणजे हा आजार पुन्हा होणार नाही का?

खरं तर, उपचार पूर्ण झाले म्हणजे कॅन्सरचा धोका पूर्णपणे संपला असं नाही. काही महिलांमध्ये उपचार झाल्यानंतर अनेक वर्षांनीही कॅन्सर पुन्हा होण्याची शक्यता असते. त्यामुळे उपचारांनंतरही स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं आणि डॉक्टरांच्या संपर्कात राहणं महत्त्वाचं आहे.

याबाबत ठाण्यातील ज्यूपिटर हॉस्पिटलमधील सीनियर कन्सल्टंट मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. चेतना बक्षी यांनी सांगीतलं की, अर्ली ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचारांमध्ये फक्त कॅन्सर काढून टाकणं एवढंच महत्त्वाचं नसतं. तर भविष्यात हा आजार पुन्हा होण्याचा धोका कमी करणंही तितकंच गरजेचं असतं. प्रत्येक महिलेची प्रकृती आणि कॅन्सरचा प्रकार वेगळा असतो. त्यामुळे सर्व महिलांना एकसारखे उपचार दिले जात नाहीत. कॅन्सरचा प्रकार, तो पुन्हा होण्याची शक्यता आणि उपचारांचा फायदा या गोष्टी लक्षात घेऊन डॉक्टर उपचार ठरवतात.

ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचारांमध्ये आता अनेक नवीन पर्याय उपलब्ध झाले आहेत. उपचारांमुळे होणारे त्रास कमी करणं आणि महिलांना त्यांचं रोजचं आयुष्य व्यवस्थित जगता यावं याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. उपचारांसोबतच रुग्णाचं आरोग्य आणि जीवनमान चांगलं ठेवणं महत्त्वाचं असल्याचंही डॉ. बक्षी यांनी सांगितलं.

Breast Cancer Treatment
Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

अर्ली ब्रेस्ट कॅन्सरवरील उपचार पूर्ण झाल्यानंतर महिलांनी कोणत्या ५ गोष्टी लक्षात ठेवाव्या

उपचार पूर्ण झाले म्हणजे कॅन्सरचा धोका संपला असं नाही

ब्रेस्ट कॅन्सरवर उपचार करताना शस्त्रक्रिया, रेडिएशन आणि औषधोपचार अशा वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात. या प्रत्येक उपचाराचं काम वेगळं असतं. शस्त्रक्रियेद्वारे ट्यूमर म्हणजेच कॅन्सरची गाठ काढली जाते. तर इतर उपचारांमुळे शरीरात उरलेल्या कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्यास आणि आजार पुन्हा होण्याचा धोका कमी करण्यास मदत होते.

पण सुरुवातीचे उपचार यशस्वी झाले तरी काही महिलांमध्ये कॅन्सर पुन्हा होऊ शकतो. तो पुन्हा स्तनामध्ये, आजूबाजूच्या भागात किंवा शरीराच्या इतर अवयवांमध्येही होऊ शकतो. प्रत्येक महिलेच्या बाबतीत हा धोका वेगवेगळा असतो.

काही संशोधनांमध्ये ठराविक रुग्णांच्या गटात कॅन्सर पुन्हा होण्याचा धोका ५० टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचं समोर आलं आहे. मात्र याचा अर्थ प्रत्येक महिलेला इतकाच धोका आहे असं नाही. त्यामुळे आपल्याला कॅन्सर पुन्हा होण्याची किती शक्यता आहे, हे डॉक्टरांकडून समजून घेणं गरजेचं आहे.

काही वर्षांनंतरही कॅन्सर पुन्हा होऊ शकतो

अनेक महिलांना असं वाटतं की, उपचार पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीची काही वर्षे व्यवस्थित गेली तर कॅन्सर पुन्हा होण्याची भीती नसते. काही महिलांमध्ये अनेक वर्षांनंतरही कॅन्सर पुन्हा होऊ शकतो. हार्मोन रिसेप्टर पॉझिटिव्ह प्रकारच्या ब्रेस्ट कॅन्सरमध्ये अनेक वर्षांनंतरही आजार पुन्हा होण्याचा धोका राहू शकतो.

त्यामुळे शस्त्रक्रियेद्वारे कॅन्सरची गाठ काढल्यानंतरही डॉक्टर काही अतिरिक्त उपचार घेण्याचा सल्ला देतात. यामध्ये हार्मोनशी संबंधित उपचार, केमोथेरपी किंवा टार्गेटेड थेरपीचा समावेश असू शकतो. काही रुग्णांना एकापेक्षा जास्त उपचारांचीही गरज भासू शकते. कोणते उपचार द्यायचे, हे रुग्णाच्या आजारानुसार डॉक्टर ठरवतात.

प्रत्येक महिलेला कॅन्सर पुन्हा होण्याचा धोका सारखा नसतो

ब्रेस्ट कॅन्सर झालेल्या प्रत्येक महिलेची परिस्थिती सारखी नसते. कॅन्सरचा प्रकार आणि त्याची वाढ यावरून उपचार ठरवले जातात. त्यामुळे एकाच टप्प्यावर कॅन्सरचं निदान झालेल्या दोन महिलांनाही वेगवेगळे उपचार दिले जाऊ शकतात. कॅन्सरची गाठ किती मोठी आहे तिची वाढ किती वेगाने होत आहे आणि कॅन्सर जवळच्या लिम्फ नोड्सपर्यंत पोहोचला आहे का, या गोष्टी डॉक्टर तपासतात. त्यानंतर कोणते उपचार योग्य ठरतील, हे ठरवलं जातं.

त्यामुळे डॉक्टरांनी एखादा विशिष्ट उपचार घेण्याचा सल्ला दिला असेल तर तो का दिला आहे, याची माहिती महिलांनी करून घ्यावी. त्या उपचारांचा फायदा काय होईल, त्याचे दुष्परिणाम कोणते असू शकतात आणि इतर कोणते पर्याय उपलब्ध आहेत, याबाबत डॉक्टरांशी मोकळेपणाने बोलावं.

Breast Cancer Treatment
Blood sugar control: डायबिटीजमध्ये 3 छोट्या चुका पडू शकतात महागात; ब्लड शुगर वाढू नये यासाठी 'या' गोष्टी लक्षात ठेवा

उपचारांसोबत स्वतःच्या आरोग्याची आणि रोजच्या आयुष्याची काळजी घ्या

कॅन्सर पुन्हा होऊ नये यासाठी उपचार घेणं महत्त्वाचं आहेच. पण या उपचारांचा आपल्या रोजच्या आयुष्यावर काय परिणाम होतो, याकडेही लक्ष द्यायला हवं. काही महिलांना उपचारांदरम्यान किंवा उपचारांनंतर सतत थकवा जाणवतो. सांधेदुखी, झोप न लागणं, मळमळ आणि मानसिक ताण अशा त्रासांचाही सामना करावा लागू शकतो. याचा परिणाम नोकरी, कुटुंब आणि इतर जबाबदाऱ्यांवर होऊ शकतो. काही महिलांना हे त्रास दीर्घकाळही जाणवू शकतात.

ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचारांमध्ये आता टार्गेटेड थेरपी आणि उपचारानंतरही काही काळ दिले जाणारे अतिरिक्त उपचार असे नवे पर्याय उपलब्ध झाले आहेत. योग्य रुग्णांना या उपचारांचा फायदा होऊ शकतो आणि कॅन्सर पुन्हा होण्याचा धोका कमी करण्यास मदत मिळू शकते. पण कोणताही उपचार निवडताना त्याचा फायदा, होणारे दुष्परिणाम आणि रुग्णाच्या रोजच्या आयुष्यावर होणारा परिणाम या सर्व गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे.

तब्येत चांगली असली तरी डॉक्टरांकडे नियमित तपासणी करा

उपचार पूर्ण झाल्यानंतर तब्येत चांगली वाटत असेल आणि कोणताही त्रास होत नसेल तरी डॉक्टरांनी सांगितलेल्या तपासण्या करणं थांबवू नये. नियमित तपासण्यांमुळे डॉक्टरांना रुग्णाच्या प्रकृतीवर लक्ष ठेवता येतं. उपचारांमुळे काही त्रास होत आहेत का नवीन काही समस्या निर्माण झाली आहे का, हेही समजू शकतं.

या तपासण्यांमध्ये डॉक्टरांकडून शारीरिक तपासणी आणि गरजेनुसार मॅमोग्राफी किंवा इतर ब्रेस्ट इमेजिंग तपासण्या केल्या जाऊ शकतात. स्तनामध्ये किंवा शरीरात कोणताही नवीन त्रास जाणवत असेल किंवा एखादा त्रास सतत होत असेल तर तो डॉक्टरांना सांगावा. पुढील तपासणीची तारीख येईपर्यंत वाट पाहू नये.

Breast Cancer Treatment
Walking for Diabetes: चालल्याने ब्लड शुगर कंट्रोल होण्यास मदत होते? डॉक्टरांनी सांगितलं कोणत्या वेळी चालणं ठरेल फायदेशीर

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.