अश्विनी नक्षत्र
कारकत्व - या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती शारीरिक दृष्ट्या धडधाकट, बांधा उंच आणि प्रमाणबद्ध असतो. शरीरयष्टी काटक, जीवनशक्ती उत्तम, रोगप्रतिकार शक्ती चांगली असते. शारीरिक कष्ट आणि श्रम करतात. पुरूषी धीटपणा, धाडस, महत्त्वाकांक्षा, शौर्य स्वावलंबन आणि सतत पुढे जाण्याची इच्छा असते. अधिकार पदावर राहतात. स्वभाव उतावळा, रागीट, निश्चयी असतो. बोलणे स्पष्ट, उमदे, दिलदारपणा, बैठक खेळापेक्षा मैदानी खेळाची आवड अधिक असते.
हे नक्षत्र अग्नितत्वाचे आणि चर रास असल्याने सतत गतिशीलता दिसते. त्यामुळे प्रवासी वृत्ती, रोजच्या व्यवहारातील कामे जलद गतीत करण्यात तत्पर असतात. कोणतीही गोष्ट बोलायची घाई, चालणे घाईत, लिहिण्याची लिपी सुद्धा जलद असते. वाहन चालवण्याची खूप आवड असते. ते सुद्धा अतिशय जोरात चालवून रस्त्यावरील लोकांची भंबेरी उडवतात. कुठेही बसले तरी चालबिचल सुरू असते. सतत कोणती ना कोणती विद्या आत्मसात करण्याची या लोकांना आवडते. वेगाने वाहन चालवणे हा यांचा पिंड आहे.
नोकरी व्यवसाय -
सतत चपळता आहे. त्यामुळे नेहमी पुढाकार घेऊन होणारी कामे हे लोक करतात. नक्षत्र केतूचे तर राशी स्वामी मंगळ त्यामुळे धडपडी वृत्ती, पोलीस खाते, सैनिकी खाते, फायर ब्रिगेड, कारखाने त्यात विशेषतः फर्नेस जवळ काम करणारे, विद्याव्यासंगी, डॉक्टर, इंजिनियर, वाहन चालक, वकील कम्प्युटर तज्ञ, इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक तज्ञ असतात. भूगर्भ वेत्ता आणि घोड्याचे व्यापारी हे लोक असू शकतात.
रोग आजार -
अग्नी तत्व नक्षत्र आहे. त्यामुळे प्रकृती उष्ण आणि पित्तकारक असते. सतत डोके दुखण्याचा त्रास असतो. डोळ्यांचे विकार, उन्हात जाण्याने अत्यंत त्रास होतो. गळवे, मुळव्याध, तोंड येणे, उन्हाने चक्कर येणे, भाजणे, शस्त्रक्रिया करावी लागणे, ताप येणे, अपस्मार, डोक्याला लागणे, विस्मृती, लकवा, उष्णता आणि वातजन्य विकाराला सामोरे जावे लागते.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.