नुकताच राज्यामधील महत्वाचा समजला जाणारा ‘महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट’ पुरस्कार सोहळा पार पडला. यंदाच्या ५७व्या ‘महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट’ पुरस्कार सोहळ्यामध्ये काही ज्येष्ठ कलाकारांना सन्मानित करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक यांना ‘व्ही. शांताराम जीवनगौरव’ पुरस्काराने गौरविण्यात आले. नुकतंच उषा नाईक यांनी नुकताच एका एंटरटेनमेंट युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. त्यांनी दिलेली ही मुलाखत सध्या सोशल मीडियावर कमालीची चर्चेत आली आहे.
यावेळी उषा यांना मुलाखतीमध्ये "तुम्ही तुमच्या सिनेकारकिर्दित अनेक चित्रपट दिले, वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्यात, ज्या वाखाणण्याजोग्या होत्या. पण तुम्ही अनेक चित्रपटात कॅमिओच केलं, लीड रोल नाहीत, असं का?" असं प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला त्यांनी दिलेल्या उत्तराची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.
मुलाखतीमध्ये उषा नाईक म्हणतात, "मी स्पष्ट बोलणारी अभिनेत्री आहे. मला अनेकदा माझ्या आडनावावरून चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका नाकारली आहे. मी नाईक आहे, मी अगदी देशपांडे, जोशी, कुलकर्णी असते तर माझे आतापर्यंत खूप कौतुक झाले असते. पण तसं काही झालं नाही. एका विशिष्ट वयामध्ये आल्यानंतर, रोखठोक बोलायला काही हरकत नाही. आधी बोलत नव्हते, पण आता जरा स्पष्टच बोलते."
सोबतच यावेळी उषा नाईक यांनी अभियाबद्दलही भाष्य केलं आहे. त्या म्हणतात, " एक तर माझा कोणी गॉड फादर नाही. मी एका सामान्य कुटुंबातून आली आहे. मला शो ऑफ (देखावा) कसं करायचं? याबद्दल माहित नाही. मी माझ्या सिने करियरमध्ये खूप चित्रपट केले आहेत, पण मला देखावा करण्याची सवय कधीही नव्हती आणि यापुढेही कदाचित नसेल. फक्त चांगलं काम करत राहणं, चांगलं काम येईल ते स्वीकारणं आणि पुढे जाणे. इतकंच शिकत आली. मी माझं काम शेवटच्या क्षणापर्यंत कायम करत राहिल." असं अभिनेत्रीने आपल्या मुलाखतीमध्ये सांगितले.
"मला आजवर अनेक पुरस्कार मिळाले. आता मला ‘व्ही. शांताराम जीवनगौरव’ पुरस्काराने गौरविण्यात आले. याचं मला नवल वाटत नाही. मला माझ्या कामाप्रमाणेच पुरस्कार मिळाले," अशी प्रतिक्रियाही उषा नाईक यांनी दिली. उषा नाईक यांनी ‘पिंजरा’, ‘कलावंतीण’, ‘भुजंग’, ‘एक होता विदूषक’, ‘हळदी कुंकू’, ‘राखणदार’, ‘लपाछपी’ या अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी आपली छाप प्रेक्षकांमध्ये निर्माण केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.