Lagnanantar Hoilach Prem: स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मध्ये सध्या अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. मालिकेतील नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, त्यात जीव आणि नंदिनी यांच्या नात्यातील एक मोठा गैरसमज उलगडताना दाखवण्यात आलं आहे. काही भागांपूर्वी दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतल्याचं दाखवलं होतं, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता.
मात्र, नवीन प्रोमोमध्ये हे स्पष्ट होतं की नंदिनीने घटस्फोटाचा निर्णय एका चुकीच्या समजुतीवर घेतला होता. तिला वाटलं की जीव घटस्फोटासाठी आतुर आहे, पण प्रत्यक्षात असं नव्हतं. या गैरसमजाच्या उकलीनंतर दोघंही आपल्या नात्याबद्दल पुन्हा विचार करतात आणि एकमेकांना एक नवी संधी देण्याचा निर्णय घेतात.
रूममेट्स म्हणून सहा महिने
या नव्या संधीचा भाग म्हणून, जीव आणि नंदिनी सहा महिन्यांसाठी ‘रूममेट्स’ म्हणून एकत्र राहण्याचा निर्णय घेतात. हा निर्णय केवळ त्यांच्यावरच नाही, तर दुसरं जोडपं म्हणजे पार्थ आणि काव्या यांच्यावरही लागू होतो. दोन्ही जोडप्यांनी सहा महिन्यांसाठी एकाच घरात एकत्र राहायचं ठरवलं असून, यासाठी काही विशिष्ट नियम लागू करण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, त्यांना एकमेकांपासून काही अंतर राखावं लागणार आहे, एकाच बेडवर झोपायचं नाही आणि घरात घटस्फोटाची चर्चा करता येणार नाही.
प्रेमाचा एक नवा टप्पा
मालिकेतील नायक-नायिका आपल्या नात्यातील द्विधा अवस्थेतून जात असतानाच त्यांच्यातील प्रेमाची पालवीही उमटू लागलेली दिसते. नंदिनीने जीवला डिनर डेटसाठी विचारलं असून, जीव तिच्यासाठी खास कविता सादर करताना दिसतो. यामुळे मालिकेतील प्रेमाच्या प्रवासाला एक हळवं आणि सुंदर वळण मिळतंय.