अयोध्येतील श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा येत्या 22 जानेवारी होणार आहे. राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याकडे संपूर्ण देशाचे नाही तर जगाचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याची सध्या जोरदार तयारी सुरू आहे.
संगीत क्षेत्रातही राम मंदिराच्या भव्य उद्घाटन सोहळ्याचा उत्साह दिसून येत आहे. प्रभू राम आणि अयोध्येतील राम मंदिराला समर्पित अनेक गाणी रिलीज केली जात आहे आहेत. राम मंदिरावर आधारित आणखी एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. प्रसिद्ध मराठी गायक आदर्श शिंदे यांच्या आवाजातील 'प्रभू श्रीराम' गाणं नुकताच रिलीज झाले आहे.
अयोध्या येथील प्रभू श्रीराम यांच्या मंदिराचे 22 जानेवारीला उद्घाटन होणार आहे. त्यामुळे संपूर्ण देश श्रीराममय झाला आहे. श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाच्या औचित्याने 'प्रभू श्रीराम' या म्युझिक व्हिडिओची निर्मिती करण्यात आली आहे. श्रीराम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर सप्तसूर म्युझिकतर्फे या खास म्युझिक व्हिडिओची निर्मिती करण्यात आली आहे. आदर्श शिंदेने आपल्या दमदार आवाजात हे गाणं गायलं आहे. हे गाणं सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनलवर लाँच करण्यात आले आहे.
'प्रभू श्रीराम' या म्युझिक व्हिडिओची निर्मिती सप्तसूर म्युझिकच्या साईनाथ राजाध्यक्ष, बीना राजाध्यक्ष यांनी केली आहे. या गाण्याची संकल्पना साईनाथ राजाध्यक्ष यांची आहे. विपुल शिवलकर यांच्या गीताला ऋषी बी. यांनी संगीतबद्ध केलं आहे. 'अयोध्येचा राजा आपला राम मंदिरी अवतरला आता', असे या गाण्याचे शब्द आहेत. या गाण्याला प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे. हे गाणं प्रत्येक रामभक्ताला उत्साह देणारं आहे.
ग्राफिक्सचा उत्तम वापर करून या गाण्याचा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. त्यात भावभक्तीने ओथंबलेले श्रीराम भक्त, शरयू तीरावरील आरती, श्रीराम मंदिराची दृश्ये दाखवण्यात आली आहेत. त्यामुळे अवघा देश श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाच्या भव्यदिव्य सोहळ्याकडे डोळे लावून बसलेला असताना आता या प्रभू श्रीराम या गाण्यामुळे रामभक्तांच्या उत्साहाला नक्कीच उधाण येणार असल्याचे दिसून येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.