Prabhakar More Saam tv
मनोरंजन बातम्या

Prabhakar More: चिपळूणचा 'पारसमणी' आता नव्या नाटकात; हास्यजत्रा आणि सिनेमानंतर खास भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला

Prabhakar More: ‘अबब विठोबा बोलू लागला’ या गाजलेल्या बालनाट्याचा नवा प्रयोग लवकरच होणार आहे. यामध्ये प्रभाकर मोरे पुजाऱ्याच्या भूमिकेत झळकणार आहेत.

Shruti Vilas Kadam

Prabhakar More: गेली अनेक वर्षे ‘हास्यजत्रा’त कोकणी व्यक्तिरेखेमधून प्रेक्षकांना खळखळून हसवणारे अभिनेते प्रभाकर मोरे आता एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहेत. ‘अबब विठोबा बोलू लागला’ या गाजलेल्या बालनाट्यात ते प्रथमच काम करणार असून पुजाऱ्याच्या भूमिकेत झळकणार आहेत. यासाठी प्रमाण भाषेत संवाद साधण्याचं मोठं आव्हान त्यांनी यशस्वीपणे पेललं आहे. विविध विषयांवरील बालनाट्यांनी नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता त्याच परंपरेला उजाळा देत, एकेकाळी गाजलेलं आणि प्रेक्षकांना खळखळून हसवणारं ‘अबब विठोबा बोलू लागला’ हे लोकप्रिय बालनाट्य पुन्हा एकदा रंगभूमीवर धम्माल करायला सज्ज झालं आहे.

नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार परिषदेत प्रभाकर मोरे यांनी सांगितलं, “प्रमाण भाषेत बोलणं माझ्यासाठी खूप मोठं चॅलेंज होतं. इतकी वर्षं कोकणी व्यक्तिरेखा साकारल्यानंतर हा बदल सोपा नव्हता. त्यामुळे या नाटकासाठी मला अधिक वेळ देऊन मेहनत घ्यावी लागली. पण त्या प्रक्रियेत खूप काही नवीन शिकायला मिळालं.” संस्कृती आणि परंपरेची सुंदर सांगड घालणारं हे बालनाट्य केवळ लहान मुलांसाठीच नव्हे, तर मोठ्यांनाही अंतर्मुख करणारं ठरणार आहे. आजच्या मोबाईलच्या आहारी गेलेल्या पिढीला वास्तवाशी पुन्हा जोडण्याचा प्रयत्न या नाटकातून प्रभावीपणे करण्यात आला आहे. मनोरंजनासोबतच विचार करायला भाग पाडणार ‘अबब विठोबा बोलू लागला’ हे बालनाट्य लहान मोठ्या प्रत्येकाने आवर्जून बघावं, असं आवाहन प्रभाकर मोरे यांनी यावेळी केलं.

‘कर्टेन रेझर एंटरटेनमेंट’ आणि ‘लिटिल थिएटर’ अर्थात‘बालरंगभूमी’या संस्थेकडून नीळकंठ नांदुरकर लिखित हे विनोदी नाटक नव्या संचासह प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या नाटकाचा इतिहासही तितकाच समृद्ध आहे. यापूर्वी लक्ष्मीकांत बेर्डे, विजय केंकरे, विनोद हडप यांसारख्या दिग्गज कलाकारांनी या नाटकात काम करत त्याला अफाट लोकप्रियता मिळवून दिली होती. त्यांच्या अभिनयामुळे हे नाटक त्या काळात प्रचंड गाजलं होतं. आता सुधाताईंच्या पश्चात निर्माती नमिता वागळे-गिरकर या नाटकाला नव्या रूपात सादर करत आहेत.

या नव्या नाटकात प्रसिद्ध अभिनेते प्रभाकर मोरे ‘धम्माल पुजारी’च्या भूमिकेत असून त्यांच्यासोबत सागर पवार, नीता दोंदे, निखिल केंजळे, प्रकाश अय्याळ, अजित सावरे, प्रेम औटि, आशिक चव्हाण, विरराज राजपूत, उन्नती शिंदे, बालकलाकार अबीर जोशी, गोजिरी जगदाळे, कियारा पाटील, श्रीजा पोटे, आयुष टेंबे, ध्रुव खानविलकर, सिद्धेश बरीदे, ओवी भुजबळ, मृगा जोशी नाटाकाची रंगत वाढवणार आहेत.

मालिका आणि चित्रपट क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे दिग्दर्शक प्रशांत गिरकर ‘अबब विठोबा बोलू लागला’ या नाटकाचं दिग्दर्शन करत असून, त्यांच्या दिग्दर्शनातून या नाटकाला आधुनिक सादरीकरणाची जोड मिळाली आहे. जुन्या आठवणींना नवी झळाळी देत, विनोद आणि संदेश यांचा सुंदर मेळ घालणाऱ्या या बालनाट्याचे पुढील प्रयोग १६ एप्रिल गुरुवार दु ४:३० काशीनाथ घाणेकर, ठाणे १७ एप्रिल शुक्रवार स ११:३० प्रबोधनकार ठाकरे, बोरिवली १७ एप्रिल शुक्रवार संध्या ७:३० शिवाजी मंदिर, दादर येथे होणार आहेत. मुंबई, पुणे, नाशिक येथे १० यशस्वी प्रयोग झाल्यावर मुलांच्या परीक्षे नंतर आता सुट्टीत महाराष्ट्रभर याचे प्रयोग होणार आहेत. १ ते ३ मे कोकण दौरा आहे.

Thursday Horoscope : खर्चावर नियंत्रण ठेवा, ५ राशींच्या व्यक्तींना होणार अचानक धनलाभ; वाचा गुरूवारचे राशीभविष्य

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवर पुन्हा परिस्थिती बिघडली; विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीचार्ज, पोलिसांवर दगड, बाटल्या फेकल्या

नागपुरात धक्कादायक घटना! दुपारी सुट्टीच्या वेळी चक्कर आली; उपचारादरम्यान तिसरीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Schools Closed: पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना उद्या सुट्टी,काय आहे कारण जाणून घ्या

दिल्लीतील आंदोलनात मराठा एल्गार, पुन्हा हल्ला केल्यास सरकारचा माज उतरवणार

SCROLL FOR NEXT