Phulwara Movie: मराठी चित्रपटसृष्टीत पुन्हा एकदा लावणी आणि तमाशाच्या विश्वाची जादू अनुभवायला मिळणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांच्या आगामी ‘फुलवरा’ चित्रपटाचा अस्सल बावनकशी टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. लावणी कलाकारांचा संघर्ष, कलेप्रती असलेली निष्ठा आणि स्वप्नांसाठी घेतली जाणारी मेहनत या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. ‘घुंगरू पायाला नाही गं, काळजाला बांधून नाचावं!’ या प्रभावी ओळीने टीझरने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशन्सची निर्मिती असलेला हा चित्रपट १४ जानेवारी २०२७ रोजी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.
‘फुलवरा’च्या टीझरमध्ये कोणत्याही कलाकाराचा चेहरा दाखवण्यात आलेला नाही. त्याऐवजी लावणी कलाकारांचे पाय, पायांतील घुंगरू आणि त्यांच्या संघर्षमय प्रवासाची झलक पाहायला मिळते. कुठे जल्लोषात नाचणारे पाय, कुठे अडखळणारा प्रवास, तर कुठे रक्ताने माखलेले पाय अशा दृश्यांतून कलाकारांच्या आयुष्यातील संघर्ष अधोरेखित करण्यात आला आहे. देवीला फुलवरा वाहणारे हात, ढोलकीवर थाप मारणारे हात आणि तबल्याच्या तालावर थिरकणारे पाय या दृश्यांमधून महाराष्ट्राच्या लोककलेचे दर्शन घडते. हर्ष-विजय या संगीतकार जोडीचे संगीत टीझरला अधिक प्रभावी बनवते.
रवी जाधव यांनी सांगितला चित्रपटामागचा विचार
‘फुलवरा’बद्दल दिग्दर्शक रवी जाधव म्हणतात, “लावणीचा विचार करताना आपल्या डोळ्यांसमोर तिचा ठेका, रंगमंचावरची ऊर्जा आणि कलाकारांची अदाकारी येते, पण या प्रत्येक गोष्टीमागे असते ती वर्षानुवर्षांची मेहनत आणि कलेशी असलेली अतूट बांधिलकी. ‘फुलवरा’च्या टीझरमधून आम्हाला हाच भाव पोहोचवायचा होता. वेगवेगळ्या वयोगटांतील मुलींच्या पायांतले घुंगरू आणि त्यांना लागलेले रक्त-माती ही त्या प्रवासाची प्रतीकं आहेत. ‘घुंगरू पायाला नाही गं, काळजाला बांधून नाचावं!’ ही ओळ आमच्यासाठी केवळ संवाद नाही, तर लावणी जगणाऱ्या प्रत्येक कलाकाराच्या भावनेचं प्रतिनिधित्व करते. महाराष्ट्राच्या या समृद्ध लोककलेमागची जिद्द, तिच्यावरचं प्रेम आणि ती जपण्यासाठी घेतले जाणारे कष्ट प्रेक्षकांपर्यंत पोहोचावेत, हा ‘फुलवरा’मागचा प्रामाणिक प्रयत्न आहे.”
सुमारे १७ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या रवी जाधव यांच्या ‘नटरंग’ चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत मोठा इतिहास घडवला होता. लावणी आणि तमाशा या लोककलांना मोठ्या पडद्यावर नवी ओळख मिळवून दिली होती. आता ‘फुलवरा’च्या माध्यमातून पुन्हा एकदा या कलाविश्वातील संघर्ष आणि कलाकारांचे भावविश्व उलगडणार आहे.
‘द फोक आख्यान’मधील हर्ष-विजय या संगीतकार जोडीने चित्रपटाला संगीत दिले आहे. तर ईश्वर ताराबाई अंधारे यांनी कथा, पटकथा, संवाद आणि गीते लिहिली आहेत. चित्रपटातील कलाकारांची नावे आणि कथानक अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे ‘फुलवरा’मध्ये नेमके काय पाहायला मिळणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.