केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाला (Baipan Bhaari Deva Movie) प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. २०२३ या वर्षामध्ये बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत हिट चित्रपटांच्या यादीमध्ये या चित्रपटाचा समावेश झाला. जून २०२३ मध्ये हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांच्या मनामध्ये असलेली क्रेझ आजही कमी झालेली नाही. या चित्रपटातील प्रत्येक महिला कलाकाराच्या अभिनयाचे कौतुक करण्यात येत आहे. अशामध्ये आता या चित्रपटाच्या टीमने आणखी एक बाजी मारली आहे. या चित्रपटाच्या टीमला झी चित्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
नुकताच पार पडलेल्या 'झी चित्र गौरव पुरस्कार 2024' सोहळ्यामध्ये (Zee Chitra Gaurav Award 2024) मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली. आपल्या हटके ड्रेसिंग स्टाइलमध्ये हजेरी लावत मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी या पुरस्कार सोहळ्यामध्ये चार चाँद लावले. या पुरस्कार सोहळ्यामध्ये 'बाईपण भारी देवा' या चित्रपटातील अभिनेत्रींचीच हवा पाहायला मिळाली. या पुरस्कार सोहळ्यामध्ये पहिल्यांदाच अशी एक घटना घडली की, सर्वोत्कृष्ट पुरस्कारांमध्ये पहिल्यांदाच सहा अभिनेत्रींना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.
या पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री श्रेणीमध्ये 'बाईपण भारी देवा' या सिनेमाला पुरस्कार मिळाला. महत्वाचे म्हणजे या चित्रपटात काम केलेल्या सहाही अभिनेत्रींना हा पुरस्कार विभागून देण्यात आला. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत असलेल्या सुकन्या मोने, दीपा परब, रोहिणी हट्टंगडी, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि वंदना गुप्ते या अभिनेत्रींना पुरस्कार देण्यात आला.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून पुरस्कार मिळाल्यानंतर सुकन्या मोने यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर खास पोस्ट करत आनंद व्यक्त केला. सुकन्या यांनी पुरस्कार मिळाल्यानंतर सहाही अभीनेत्रींचा पुरस्कारासोबतचा ग्रुप फोटो आणि स्वत:चे पुरस्कारासोबतचे फोटो इन्स्टावर शेअर केले. या पोस्टमध्ये त्यांनी असे लिहिले की, 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार....झी गौरव....आम्हा सगळ्यांना मिळाला आणि त्याचप्रमाणे तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांनी जो उत्तुंग प्रतिसाद आम्हाला दिलात त्यामुळे सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट पुरस्कार... झी गौरव... ही आम्हाला म्हणजेच तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या चित्रपटाला ' बाईपण भारी देवा! 'ला असेच प्रेम,आशीर्वाद आयुष्यभर आमच्या बरोबर असू देत....कायम. खास करून तमाम महिलांना मानाचा मुजरा ज्यांनी आम्हाला हा आनंद ,हे उत्तुंग यश दाखवल.'
त्याचसोबत, 'हा चित्रपट लोकप्रिय करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी हातभार लावला आहे त्या सगळ्यांचे मनःपूर्वक आभार! श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया!', असे म्हणत सुकन्या मोने यांनी सर्व प्रेक्षकांचे आणि चित्रपटाच्या टीमचे आभार मानले आहे. त्यांच्या या पोस्टला चाहत्यांनी पसंती दिली आहे. त्याचसोबत अनेकांनी या पोस्टवर कमेंट्स करत सुकन्या मोनेसह चित्रपटातील इतर महिला कलाकारांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.