मराठी फिल्म इंडस्ट्रीतील 'अप्सरा' म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोनाली कुलकर्णीचा आज वाढदिवस आहे. सोनाली कुलकर्णी आज आपला ३६ वा वाढदिवस साजरा करीत आहे. तिने मराठीसह बॉलिवूड आणि टॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक चाहत्यांना दाखवली आहे. सोनाली कुलकर्णीचा जन्म १८ मे १९८८ रोजी पुण्यात झाला होता. सोनालीने 'गाढवाचं लग्न' चित्रपटातून मराठी फिल्म इंडस्ट्रीतून डेब्यू केलं होतं. सोनाली आज मराठी सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे, पण तिचा हा मराठी सिनेसृष्टीतील प्रवास काही सोप्पा नव्हता.
सोनालीचे वडील भारतीय सैन्यदलात होते, सोनालीचा जन्म मिलिटरी हॉस्पिटलमध्ये झाला आहे. त्यांनी भारतीय सैन्य दलात जवळपास ३० वर्ष नोकरी केली असून त्यांनी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळला. सोनालीची आई मुळची पंजाबी असून त्यांचे नाव सविंदर कुलकर्णी आहे. तर तिच्या वडीलांचे नाव मनोहर कुलकर्णी असं आहे. तिच्या घरात अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नव्हती. आई वडील दोघेही लष्करात कार्यरत होते. मात्र, सोनालीने अभिनयक्षेत्र निवडून या इंडस्ट्रीत मोठा पल्ला गाठला आहे.
सोनाली अभिनेत्री होण्यापूर्वी पत्रकार होती. तिने पत्रकारितेचं शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून पदवीचं पुर्ण केलं आहे. तर त्यानंतर इंदिरा स्कूल ऑफ कम्युनिकेशन या संस्थेतून सोनालीने रेडिओ टेलिव्हिजन अँड फिल्म प्रोडक्शन या विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले. आई- वडील दोघेही सैन्यात कार्यरत असल्यामुळे घरात तिच्या थोडंस स्ट्रिक्ट वातावरण होतं. लहानपणापासूनच जिथे संधी मिळेल तिथे सोनाली नाटकामध्ये आणि डान्समध्ये सहभाग घ्यायची. फिल्म इंडस्ट्रीमध्ये सोनालीने आपल्या निस्सिम सौंदर्याची आणि अभिनयाची छाप पाडली आहे.
‘गाढवाचं लग्न’, ‘अजिंठा’, ‘नटरंग’, ‘इरादा पक्का’, ‘मितवा’, ‘बघतोस काय मुजरा कर’, ‘पोश्टर गर्ल’, ‘हिरकणी’, ‘पांडू’, ‘झिम्मा’ या मराठी चित्रपटांतून सोनाली कुलकर्णीने चाहत्यांचे निखळ मनोरंजन केले आहे. तर ‘ग्रँड मस्ती’ आणि ‘सिंघम रिटर्न’ या चित्रपटातून बॉलिवूड चाहत्यांमध्ये आपल्या अभिनयाची तिने चुणूक दाखवली. तर गेल्या वर्षी टॉलिवूडमध्येही सोनालीने डेब्यू केले आहे. तिने ‘मलायकोट्टय वालिबान’ चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली. लवकरच सोनालीचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ हा ऐतिहासिक मराठी चित्रपट रिलीज होणार आहे.
सोनाली कुलकर्णी कॉलेजमध्ये असताना एका सिनियर मुलाच्या प्रेमात होती. ते दोघेही जवळपास पाच वर्षे एकमेकांना डेट करीत होते. पण पाच वर्षांच्या रिलेशननंतर त्या दोघांनीही सामंजस्याने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही वर्षांपूर्वीच सोनालीने बिझनेसमन कुणाल बेनोडेकरसोबत लग्नगाठ बांधली. सोनालीने कुणालसोबत दोनदा लग्न केले होते.
एकदा कोरोनाकाळात दुबईमध्ये. पण ते लग्न तिने अगदी साध्या सिंपल अंदाजात केले होते. लग्नाची मौज मस्ती व्हावी यासाठी तिने दुसऱ्यांदा लंडनमध्ये लग्न केले. लंडनमध्ये सोनाली आणि कुणालने अत्यंत दिमाखदार पद्धतीने लग्नगाठ बांधली. सोनाली मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. मीडिया रिपोर्टनुसार ती एका चित्रपटासाठी २० ते २५ लाख रुपये मानधन घेते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.