मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली
‘मुळशी पॅटर्न’ फेम अभिनेत्याला फटकारले
मनसेत राहायचं असेल, तर काम करावं लागेल असा ठाकरेंचा इशारा
Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आगामी निवडणुका आणि पक्ष बांधणीच्या कामात दिरंगाईसाठी नाराजी व्यक्त केली. या बैठकीत त्यांनी खास करून ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटातील पिट्याभाई म्हणून ओळखले जाणारे आणि मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष रमेश परदेशी यांना सर्वांसमोर फटकारले.
राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले की, “फक्त पद घेऊन बसणाऱ्यांची पक्षात गरज नाही. जो कार्यकर्ता पक्षासाठी वेळ देत नाही, त्याने पद सोडावे. पक्षात सक्रियपणे काम करणाऱ्यांनाच स्थान मिळेल.” त्यांच्या या विधानाने संपूर्ण सभागृहात काही क्षण शांतता पसरली.
तसेच, काही दिवसांपूर्वी रमेश परदेशी यांनी संघाच्या वेशातील फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. यावरून राज ठाकरे यांनी रमेश परदेशींना थेट प्रश्न विचारला आणि सुनावलं. "तू छातीठोकपणे सांगतोस, संघाचा कार्यकर्ता आहेस. तर, कशाला टाईमपास करतोस? एकाच ठिकाणी कुठे तरी राहा." रमेश परदेशी यांना फटकारल्याची चर्चा सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
पुणे आणि परिसरातील मनसे पदाधिकाऱ्यांची ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरली. यात राज ठाकरे यांनी विविध शाखांच्या कामाचा आढावा घेतला आणि येणाऱ्या काळात संघटनात्मक फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “मनसेत राहायचं असेल, तर काम करावं लागेल. दुसऱ्या विचारधारेसोबत न राहता पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांनाच स्थान दिलं जाईल.”
राज साहेब माझ्यावर चिडले नाहीत
या बैठकीनंतर रमेश परदेशी यांनी खुलासा केला असून माझ्यावर राज साहेब चिडले नाहीत. फक्त मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक फोटो सोशल मीडियावर अपलोड केला, त्यावरून मला ठाकरे शैलीत ते मिश्किलपणे बोलले. असे, स्पष्टीकरण अभिनेता रमेश परदेशी यांनी दिले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.