महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले.
अजित पवारांच्या निधनानंतर 'बिग बॉस मराठी 5'चा विजेता सूरज चव्हाणने भावुक पोस्ट केली आहे.
अजित पवारांनी सूरज चव्हाणला घर बांधून दिले.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले आहे. अजित पवार यांच्या निधनाने अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. प्रत्येक क्षेत्रातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. मनोरंजन सृष्टीतून कलाकार सोशल मीडियावर पोस्ट करून दुःख व्यक्त करत आहे. 'बिग बॉस मराठी 5' चा विजेता सूरज चव्हाणने देखील अजित पवार यांच्या निधनानंतर भावुक पोस्ट शेअर केली आहे. सूरज चव्हाणसाठी अजित पवार आई-वडीलांच्या ठिकाणी होते.
सूरज चव्हाणने पोस्टमध्ये अजित पवारांसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. सूरज चव्हाण हा स्वतः बारामतीच्या मोढवे गावचा राहणारा आहे. बिग बॉसच्या विजयानंतर अजित पवारांनी सूरजला घर बांधून देण्याचे वचन दिलं होते. अवघ्या वर्षभरात सूरजचे हक्काचे घर तयार झाले. अजित दादांनी आपला शब्द पाळला. ज्यांनी आपल्याला राहायला घर दिले, तो देवमाणूस असा अचानक जग सोडून गेल्यामुळे सूरज चव्हाण भावुक झाला.
"मित्रांनो माझा देव चोरला आज...मित्रांनो मला अजिबात विश्वास होत नाहीये की, आपले लाडके कार्यसम्राट अजित दादा आपल्यात नाहीयेत...माझ्यासारख्या गरीब मुलाला त्यांनी इतकं सोन्यासारखं घर बांदून दिलं...माझी काळजी घेतली... मला नवीन आयुष्य मिळवून दिलं... अजित दादांसारखा देव माणूस या जगात नाही...याचं मला लई वाईट वाटतय...लई दुःख होतंय... माझ्या आई आप्पा नंतर अजित दादाने माझ्यासाठी इतकं केलं मी आयुष्यभर त्यांची आठवण माझ्या काळजात सांभाळून ठेवेन....दादा तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली...तुमचाच सूरज..."
अजित पवार यांचे निधन आज (28 जानेवारी 2026) सकाळी झाले. बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे विमान कोसळले. या भीषण दुर्घटनेत अजित दादांनी अखेरचा श्वास घेतला. अजित पवार मुंबईहून एका खासगी विमानाने बारामतीकडे येत होते.