छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रियालिटी शो 'झलक दिखला जा' च्या सीझन 11चा ग्रँड फिनाले (Jhalak Dikhhla Jaa 11 Winner) शनिवारी पार पडला. हा शो गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत होता. या शोची ट्रॉफी कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि वाइल्डकार्ड एन्ट्री करणाऱ्या मनीषा राणीने या शोची ट्रॉफी आपल्या नावावर केली. मनीषा राणीला (Manisha Rani) या शोच्या ट्रॉफीसोबत 30 लाख रुपयांचा चेक देण्यात आला. सध्या मनीषा राणीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तसंच, या शोच्या जजने देखील मनीषा राणीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
'झलक दिखला जा' च्या सीझन 11 चा ग्रँड फिनाले मोठ्या धुमधडाक्यामध्ये पार पडला. या ग्रँड फिनालेला 'मर्डर मुबारक'ची स्टार कास्ट सारा अली खान, विजय वर्मा आणि संजय कपूर यांनी हजेरी लावली होती. यावेळी या कलकारांनी डान्स देखील केला. या शोच्या अंतिम फेरीमध्ये मनीषा राणी, शोएब इब्राहिम, धनश्री वर्मा, अद्रिजा सिन्हा आणि श्रीराम चंद्रा हे स्पर्धक पोहचले होते. फक्त मनीषा, शोएब आणि अद्रिजा हे पहिल्या तीनमध्ये स्थान मिळवू शकले. शेवटी या शोमध्ये मनीषा राणीने बाजी मारली. मनीषा राणीने या शोच्या ट्रॉफीसह 30 लाख रुपयांचा चेक, तर नृत्यदिग्दर्शक आशुतोष पवार याला 10 लाख रुपयांचा धनादेश मिळाला. यासोबतच आयलंड, अबुधाबीला जाण्यासाठी दोघांनीही तिकिटे जिंकली.
मनीषाचा शेवटचा परफॉर्मन्स 'ठुमकेश्वरी', 'डू यू लव्ह मी', 'परम सुंदरी' आणि 'सामी सामी' या गाण्यांवर होता. शाहरुख खान स्टारर 'जवान' या चित्रपटातील 'जिंदा बंदा' या गाण्यावर शोएबने दमदार परफॉर्मन्स दिला. यानंतर त्याने 1999 मध्ये अब्बास-मस्तानच्या 'बादशाह' चित्रपटात शाहरुख खान आणि ट्विंकल खन्ना यांच्यावर चित्रित केलेले 'बादशाह ओ बादशाह' हे गाणे गायले. अद्रिजाने 'छमक चलो', 'नदिया के पार' आणि 'मूव्ह युवर बॉडी' या गाण्यांवर नृत्यदिग्दर्शित केलेल्या डान्सच्या माध्यमातून सर्वांची मने जिंकली.
बिहारमधील मुंगेर येथून आलेल्या मनीषा राणीने आपल्या विजयाचे स्वप्न सत्यात उतरवले. या शोची ट्रॉफी जिंकल्यानंतर मनीषा राणीने सांगितले की, 'जज आणि प्रेक्षकांच्या प्रेम, पाठिंबा आणि प्रोत्साहनाबद्दल मी कृतज्ञ आहे. मला माहित होते की, हा अनुभव माझे जीवन बदलेल आणि ते खरं आहे. वाइल्डकार्ड एंट्री म्हणून, मला स्वतःला सिद्ध करण्यासाठी दुप्पट मेहनत करावी लागली आणि प्रत्येक क्षण उत्साहाने भरलेला राहिला आणि एक नृत्यांगना म्हणून माझी नवी ओळख निर्माण झाली.' कोरानाच्या काळात लॉकडाऊन दरम्यान टिकटॉक, इन्स्टाग्राममुळे मनीषा राणीला प्रसिद्धी मिळाली. डान्स रील्स शेअर करत तिने प्रसिद्धी मिळवली होती. तिचे यापूर्वी 'बिग बॉस ओटीटी 2' मध्ये द्वितीय उपविजेतेपदाचा पुरस्कार जिंकला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.