जड अंत:करणाने आज आपण सर्व लाडक्या गणरायाला निरोप देत आहोत. गणरायाची १० दिवस मनोभावे पुजा केल्यानंतर सामान्य नागरिकांसह सेलिब्रिटी मंडळी देखील गणरायाला निरोप देणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी देखील गणपती बाप्पाचे आगमन झाले होते. यावेळी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत मराठी सेलिब्रिटींनी त्यांच्या घरी जाऊन दर्शन घेतले. नुकतंच काल मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवीने सुद्धा दर्शन घेतले. नुकतंच अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट करत तिचा अनुभव शेअर केला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या बाप्पांचे दर्शन घेतल्यानंतर अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करतात. मुख्यमंत्र्यांचे आभार मानत त्यांच्यासोबत फोटोही शेअर करत असतात. अशातच मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवीने सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी ‘वर्षा’ येथे जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी अभिनेत्रीने मुख्यमंत्र्यांचे आभार मानत तिने पोस्ट शेअर केली आहे.
दरम्यान, हेमांगी अनुभव शेअर करताना पोस्टमध्ये म्हणते, “जेव्हा थेट ‘वर्षा’ वरून बोलावणं येतं! महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी त्यांच्या घरच्या गणपतीच्या दर्शन आणि आशीर्वादासाठी आमंत्रित करून मान दिल्याबद्दल खरंच खुप खुप आभार. वर्षा बंगल्यात त्यांच्याबरोबर बाप्पाची केलेली आरती हा एक आल्हाददायक अनुभव होता, जो कायम स्मरणात राहील! एवढंच नाही तर सौ. लताताईं, वृषाली वहिनी आणि त्यांची मंडळी अगदी घरच्यांप्रमाणे प्रेमाने आमच्या पाहुणचाराची विचारपूस करत होते. असं वाटलं जणू आपल्या जवळच्या नातेवाईकाकडेच सणाला आलो आहोत! कसलीच औपचारिक्ता नाही. आता सेक्युरिटी रिझन्स मुळे काही गोष्टी नाही शेअर करू शकत पण बंगल्यात शिरताना मनात जी भीती किंवा दडपण होतं ते आत गेल्यानंतर एकदम नाहीसं झालं!
अनुभव शेअर करताना हेमांगी पुढे आपल्या पोस्टमध्ये म्हणते, “मंगेश देसाई तुझ्यामुळे हे शक्य झालं त्याबद्दल तुला अनेक धन्यवाद. यानिमित्ताने कित्येक वर्षांपासून कुतूहलाचा विषय असलेला आणि बाहेरून पाहत आलेलो ‘वर्षा’ आतून पाहण्याची ईच्छा पुर्ण झाली! खरं सांगायचं तर त्या वास्तूबद्दलचं असलेलं आकर्षण पुढच्या अर्ध्या तासात संपून त्यात राहणाऱ्या व्यक्तीवर केवढी मोठ्ठी जबाबदारी आहे या जाणिवेने आदर वाढायला लागतो! घरात गणपती आहेत म्हणून जरा निवांत असतील मुख्यमंत्री तर छे! पाहुण्यामंडळींमधून त्यांच्या नकळत वेळ काढून मध्ये मध्ये आत जाऊन कामकाज करणं, कसल्याशा फाईल्स वर त्यांच्या कर्मचाऱ्यांना सह्या देणं एकीकडे चालूच होतं.”
पुढे आपल्या पोस्टमध्ये ती म्हणते, “ “मी जरा दबकतच माझ्या ओळखीच्या व्यक्तीला विचारलं की… “गणपतीच्या एवढ्या सगळ्या गडबडीत आणि तेही एवढ्या लेट कसल्या सह्या चालंल्यात? तर म्हणाला “उद्याच्या सार्वजनिक सुट्टीबद्दल असू शकतं काहीतरी.” मी पुढे म्हटलं “राज्याच्या कारभारासोबत गेल्या दहा दिवसांतला गोतावळा सांभाळायचा, लाखो लोकांना पर्सनली भेटायचं, त्यांचं स्वागत करायचं, विचारपुस करायची.”
“बरं तिथं गेलेल्या प्रत्येकाला वाटतं त्यांच्या बरोबर फोटो हवाच त्यासाठी कुणालाही नाराज न करता, प्रोटोकॉल्स सांभाळत लाखो फोटोज् साठी उभं राहयचं. उत्सहाच्या भरात मी पण त्यांना फोटो साठी विचारल्याचं आठवलं, लाज वाटली आणि त्यांच्याबद्दल वाईट ही वाटलं! म्हटलं “अशाने यांना थकायला होत नसेल का?”
“तर तो म्हणाला “इथं असंच काम चालतं! आपल्या ठाण्यातसुद्धा आधी असंच काम करायचे की! न थांबता, अविरत!” मी मनात म्हटलं “गणपती बाप्पा यांना एक माणूस म्हणून शक्ती देओ आणि मुख्यमंत्री म्हणून यांच्या हातून महाराष्ट्राचं, आम्हां नागरिकांचं अधिक कल्याण घडो!” खरंच राजकारण, समाजकारण! सोप्पं नाही गड्या!”
सोबतच काल मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी ‘वर्षा’ येथे अमृता खानविलकरने ही बाप्पाचे दर्शन घेतले. तिच्यासोबत आई, स्पृहा जोशी, सुकन्या मोने आणि श्रेया बुगडे यांनी एकत्र जात दर्शन घेतले. त्यांच्या भेटी दरम्यानचा फोटो अभिनेत्री अमृता खानविलकर हिने सोशल मीडियावर देखील शेअर केला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.