संजय गडदे, साम टिव्ही प्रतिनिधी
Famous Director Death: बॉलिवूड चित्रपटसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते संजय गुप्ता यांचे वयाच्या ५७ व्या वर्षी निधनाची बातमी समोर आली आहे. ३० ऑक्टोबरच्या रात्री २.३० च्या दरम्यान बाथरुममध्ये पडल्यामुळे डोक्याला मार लागल्याने त्यांचे निधन झाले. ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांच्या निधनाबद्दल समजले. मात्र, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या निधनाच्या वृत्तामुळे बॉलिवूडमध्ये शोककळा पसरल्याची माहिती समोर येत आहे.
'कांटे' आणि 'शूटआउट अॅट वडाळा'मुळे मिळाली लोकप्रियता
संजय गुप्ता हे बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शकांपैकी एक म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपटांचे दिग्दर्शन केले. 'कांटे', 'शूटआउट अॅट वडाळा', 'काबिल', 'आतिश', 'जंग', 'जज्बा', 'जिंदा' आणि 'मुसाफिर' यांसारखे चित्रपट त्यांच्या नावावर आहेत. तसेच 'मुंबई सागा', 'राम शास्त्र', 'हमेशा', 'दस कहानियां' आणि 'खौफ' यांसारख्या चित्रपटांमधूनही त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
दिग्दर्शनासोबत निर्मिती क्षेत्रातही उमटवली छाप
संजय गुप्ता यांनी केवळ दिग्दर्शनच नाही, तर चित्रपट निर्मिती क्षेत्रातही महत्त्वाचे योगदान दिले. 'शूटआउट अॅट लोखंडवाला', 'प्लॅन', 'वुडस्टॉक व्हिला', 'अॅसिड फॅक्टरी' आणि 'पंख' यांसारख्या चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली होती. त्यांच्या चित्रपटांमध्ये अॅक्शन, थरार आणि गुन्हेगारी जगताचे चित्रण पाहायला मिळत असे.
वैयक्तिक आयुष्यातही आले अनेक चढ-उतार
संजय गुप्ता यांच्या वैयक्तिक आयुष्याचीही अनेकदा चर्चा झाली. पत्नीपासून घटस्फोट घेतल्यानंतर काही वर्षांनी त्यांनी पुन्हा तिच्याशी विवाह केला होता. काही वर्षांपूर्वी पुण्याहून मुंबईला परतताना त्यांच्या कारचा भीषण अपघातही झाला होता. त्यावेळी ते स्वतः गाडी चालवत होते. मात्र, या अपघातातून ते सुखरूप बचावले होते. चेहऱ्यावर कायम हास्य आणि बालसुलभ उत्साह असणारे संजय गुप्ता यांच्या निधनाने सिनेविश्वात शोककळा पसरली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.