विजय पाटील, साम टिव्ही
Nagraj Manjule: सांगलीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि महाकवी वामनदादा कर्डक यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित पहिल्या शाहिरी लोककला संमेलनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी बोलताना त्यांनी थेट समाजस्थितीवर भाष्य केले. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या समाजासाठी घटना लिहिली तोच समाज आज दिशाहीन होऊन दुसरीकडे तोंड वर करून चालला आहे, असे ते म्हणाले.
नागराज मंजुळे म्हणाले, कलेतही आपण आपला हक्क घेता आला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या समाजासाठी घटना लिहिली तोच समाज आज दिशाहीन होऊन दुसरीकडे तोंड वर करून चालला आहे हे काही बरोबर नाही आपल्यासाठी आपणचं गुंतवणूक आणि साठवणूक केली पाहिजे दुसऱ्याकडे हात पसरवण्यापेक्षा आपला मार्ग आपणचं तयार केला पाहिजे.
लोकसंगीत आणि शाहिरी परंपरा जपणाऱ्या कलाकारांचे जीवन कायम संघर्षमय आणि दुःखमय राहिले आहे. त्यामुळे अशा कलावंतांनी आता हुशारीने स्वतःला सादर करायला हवे तसेच कला कोणत्या दिशेने न्यायची याचा निर्णय सर्वांनी मिळून घ्यायला हवा, असे आवाहनही त्यांनी केले.
या संमेलनात आळंदीचे आदिनाथ महाराज यांना लोककला जीवन गौरव पुरस्कार आणि चांदीचा कडा देऊन नागराज मंजुळे यांच्या हस्ते तसेच गायिका कडुबाई खरात यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. याशिवाय दहा लोककलावंतांना पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
नागराज मंजुळे हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाचे नाव आहे. फॅन्ड्री, सैराट, झुंड यांसारख्या चित्रपटांतून त्यांनी समाजातील जातीय भेदभाव, विषमता आणि वंचित घटकांचे वास्तव प्रभावीपणे मांडले आहे. त्यांचा पहिला लघुपट पिस्टुल्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. लेखक, कवी आणि अभिनेता म्हणूनही ते कार्यरत आहेत. त्यांच्या कामामुळे मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळा दर्जा मिळाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.