भोजपुरी सिनेसृष्टीतील (Bhojpuri Film Industry) प्रसिद्ध अभिनेत्री अक्षरा सिंहबाबत (Akshara Singh) एक मोठी बातमी समोर येत आहे. अभिनय आणि गायनाच्या दुनियेत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर अक्षरा सिंह आता राजकारणाच्या जगामध्ये प्रवेश करणार आहे. अक्षरा सिंहने नुकताच प्रशांत किशोर यांच्या जन सूरज पार्टीत प्रवेश केला. भोजपुरी चित्रपटातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक असलेल्या अक्षराने नुकताच प्रशांत किशोर यांची भेट घेतली होती. त्यांची भेट घेतल्यानंतर तिने राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
अक्षरा आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अक्षराने 'आज तक'शी बोलताना राजकारणात प्रवेश केल्याबाबतची माहिती दिली. अक्षरा सिंहने एका मुलाखतीत सांगितले की, 'ती राजकारणाच्या जगात प्रवेश करत आहे आणि जन सूरज पार्टीमध्ये सामील होणार आहे. प्रशांत किशोर हे राजकीय सूत्रधार आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
अक्षराचे वडील आणि अभिनेते विपिन सिंह म्हणजेच इंद्रजीत सिंह यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. अक्षराच्या राजकीय प्रवेशाबाबत ते देखील खूपच खूश आहेत. त्यांनी सांगितले की, 'माझी मुलगी अक्षराने राजकारणात येण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावर मी लगेच हो म्हणालो. अक्षराने जन सूरज पार्टीमध्ये प्रवेश केल्याचा मला आनंद आहे. संपूर्ण कुटुंब तिच्यासोबत आहे.
अक्षरा सिंह पटना येथील रहिवासी असल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत ती येथून निवडणूक लढवू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. तसंच, प्रशांत किशोर त्यांना कोणत्या ठिकाणाहून निवडणूक लढवण्यासाठी तिकीट देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
अक्षरा सिंहच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, अक्षरा सिंहने 2010 मध्ये भोजपुरी चित्रपट 'सत्यमेव जयते'मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तिने 'सत्या', 'तबादला', 'धडकन' आणि 'माँ तुझे सलाम' यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. अक्षरा सिंग एक भोजपुरी गायिका देखील आहे आणि तिने अनेक गाणी गायली असून ते सुपरहिट ठरले आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.