तुषार कपूर आणि आयुष्मान खुराना यांच्यासह अनेक अभिनेत्यांना धमकी
धमकी देणाऱ्या आरोपीला अटक
लॉरेन्स बिश्नोई गँगचे व्हिडिओ वारंवार पाहत असल्याची माहिती
साम टीव्ही प्रतिनिधी - साक्षी यादव
बॉलिवूड कलाकारांना धमकी देण्याच्या प्रकरणात एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. अभिनेता तुषार कपूर आणि आयुष्मान खुराना यांच्यासह अनेक सेलिब्रिटींना धमकी देणारा आयटी इंजिनिअर वैभव मिश्रा हा लॉरेन्स बिश्नोई गँगच्या व्हिडिओंच्या प्रभावाखाली असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. स्वतःला गँगचा सदस्य असल्याचे भासवून त्याने अभिनेत्यांना धमकावल्याचा आरोप आहे.
अभिनेता तुषार कपूर आणि आयुष्मान खुराना यांच्यासह अनेक बॉलिवूड कलाकारांना धमकी देणारा आरोपी वैभव मिश्रा याला पोलिसांनी अटक केली आहे. बेंगळुरूमधून अटक करण्यात आलेला वैभव मिश्रा हा आयटी इंजिनिअर असल्याची माहिती समोर आली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगच्या व्हिडिओंचा आरोपीवर प्रभाव असल्याचे तपासादरम्यान उघड झाले आहे. न्यायालयाने आरोपीला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, वैभव मिश्रा हा लॉरेन्स बिश्नोई गँगचे व्हिडिओ वारंवार पाहत होता. या व्हिडिओंच्या प्रभावाखाली त्याने स्वतःला लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य असल्याचे भासवले आणि अनेक अभिनेत्यांना धमकी दिल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या प्रकरणामुळे मनोरंजन क्षेत्रात खळबळ उडाली आहे.आरोपीने विविध अभिनेत्यांचे मोबाईल क्रमांक ऑनलाइन माध्यमातून मिळवले होते. त्यानंतर काही कलाकारांना ऑडिओ मेसेजद्वारे धमकी देण्यात आली, तर काहींना इन्स्टाग्रामच्या माध्यमातून धमकावल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. या धमक्यांमध्ये आरोपीने स्वतःचा संबंध लॉरेन्स बिश्नोई गँगशी असल्याचे सांगितल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
पोलिसांना आरोपीच्या मोबाईलमधील जुना डेटा आणि रेकॉर्ड डिलीट करण्यात आल्याचा संशय आहे. त्यामुळे आरोपीने यापूर्वी कोणाला धमकी दिली होती, तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे.वैभव मिश्राने तुषार कपूर आणि आयुष्मान खुराना यांच्यासह इतर कोणत्या व्यक्तींना धमकी दिली होती, याची माहिती पोलीस गोळा करत आहेत. आरोपीच्या डिजिटल उपकरणांची तपासणी करून धमकीचे मेसेज, कॉल आणि सोशल मीडिया अकाउंट्सशी संबंधित पुरावे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
आरोपीने अभिनेत्यांना धमकी देण्यामागे नेमका काय उद्देश होता, याचा तपास पोलीस करत आहेत. धमक्यांच्या माध्यमातून पैसे उकळण्याचा त्याचा हेतू होता की लॉरेन्स बिश्नोई गँगच्या व्हिडिओंचा प्रभाव पडल्यामुळे त्याने हे कृत्य केले, याचा शोध घेतला जात आहे.बेंगळुरूमधून अटक करण्यात आलेल्या वैभव मिश्राला न्यायालयाने मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडीत आरोपीची चौकशी करून या प्रकरणातील आणखी महत्त्वाचे तपशील समोर येण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.