गिरीश निकम, साम टिव्ही
इंदूर : लग्न झाल्यावर हनिमून आणि सुखी संसाराची स्वप्ने रंगवणे हे अगदी ओघानं आलं. मात्र इंदूरच्या राजा रघुवंशीच्या वाट्याला हे सुख आलंच नाही. इंदूरहून मोठ्या हौसेने राजा आणि त्याची पत्नी सोनम मधुचंद्रासाठी गुवाहाटीच्या दिशेने निघाले. मात्र ही वाट थेट मृत्यूकडे जाते याची पुसटशीही कल्पना राजाला नव्हती. धक्कादायक बाब म्हणजे त्याच्या संसाराची राणी पत्नी सोनमच त्यांच्या मृत्यूचा क्लायमॅक्स लिहित होती. एखाच्या थ्रीलर क्राईम सिनेमासारखी इंदूरच्या या कपलची कहाणी आहे. . ११ मे रोजी या दोघांचा विवाह झाला होता. २० मे रोजी दोघेही मधुचंद्रासाठी मेघालयला निघाले. आधी गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शन घेतलं. पण 23 मे पासून दोघेही बेपत्ता होते. 2 जून रोजी राजा रघुवंशीचा मृतदेह सापडला आणि सोनमही बेपत्ता झाली. त्यामुळे सोनमचं अपहरण झाल्याची चर्चा होती. अखेर सोनम उत्तर प्रदेशच्या गाझिपूरमध्ये एका ढाब्यावर सापडली आणि या प्रकरणाला नाट्यमय वळण मिळालं.
मेघालयात एका दरीत राजाचा मृतदेह सापडला. त्याच्या हातावर गोंदवलेल्या राजा नावाच्या टॅटूमुळे त्याची ओळख पटली. भाडोत्री हल्लेखोरांकरवी सोनम आणि तिचा प्रियकर राज कुशवाह यांनी मिळून राजा रघुवंशीची हत्या केल्याचं उघड झालंय. सोनमचे वडील देवी सिंह रघुवंशी यांचा प्लायवूडचा कारखाना आहे. राज कुशवाह या कारखान्यात काम करायचा. तो सोनमपेक्षा सुमारे पाच वर्षांनी लहान आहे. सोनमच्या वडिलांनी मात्र मुलीचे काळे कारनामे नाकारलेत.
मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करुन माहिती दिली आहे. मेघालय पोलिसांनी मध्य प्रदेशच्या तीन हल्लेखोरांना अटक केली आहे. सोनमनेही पोलिसांसमोर शरणागती पत्करल्याचं संगमा यांनी म्हटलंय. प्रियकराच्या प्रेमात बुडालेल्या सोनमच्या या बेवफाईने सर्वत्र संताप व्यक्त होतोय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.