सचिन बनसोडे, साम टीव्ही, प्रतिनिधी
अहिल्यानगर : सततच्या कौटुंबिक वादाचा राग मनात धरून पतीने साथीदाराच्या मदतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात घडली आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी ज्वलनशील पदार्थ टाकून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलिसांनी अर्धवट जळालेला मृतदेह ताब्यात घेत तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत.
कोपरगाव तालुक्यातील डाऊच शिवारात ८ ऑगस्ट रोजी एका महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला होता. मृतदेहाची ओळख पटत नसल्याने पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान उभे राहिले होते. संबंधित महिलेचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे शव विच्छेदन अहवालातून समोर आले. त्यानंतर कोपरगाव शहर पोलिसांनी परिसरातील पेट्रोल पंपावर चौकशी करत आणि सीसीटीव्ही फुटेज तपासत धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न केला.
अहिल्यानगर जिल्ह्यासह नाशिक आणि संभाजीनगर जिल्ह्यात मृतदेहाशी मिळतेजुळत्या महिलेची बेपत्ता दाखल आहे का? यासंदर्भात माहिती पोलीस गोळा करत होते. याच दरम्यान संजय उर्फ बापू मोहिते नामक व्यक्ती घरातून गायब असल्याची तक्रार त्याच्या नातेवाईकांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली होती. बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा तपास करताना पोलिसांचा संशय बळावला आणि खुनाच्या गुन्ह्याची उकल झाली. अर्धवट जळालेला मृतदेह हा वनिता उर्फ वर्षा संजय मोहिते हिचा असल्याचे आणि पती संजयने साथीदाराच्या मदतीने तिचा खून केल्याचे समोर आले.
पोलिसांनी आरोपी पती संजय मोहितेला राहाता तालुक्यातील सावळीविहीर हद्दीतून ताब्यात घेतले. मोहिते पती पत्नीमध्ये सातत्याने कौटुंबिक वाद होत असल्याने अनेक दिवसांपासून पत्नी वनिता वेगळी रहात होती. वनिताने संजय याच्यावर काही गुन्हे दाखल केलेले असल्याने वारंवार येणाऱ्या वॉरंटमुळे तो त्रस्त झालेला होता. वनिता काही दिवसांपूर्वी नागपूरहून कोपरगावला आली त्यावेळी संजय तिला भेटला आणि गोड बोलून तिला पुण्याला जाण्यासाठी राजी केले. रस्त्यात निर्जनस्थळी साथीदाराच्या मदतीने संजयने साथीदाराच्या मदतीने वनिताचा गळा आवळला आणि चाकूने वार करून तिला संपवले. पुरावा नष्ट करण्यासाठी दुचाकीतील पेट्रोल ओतून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याची कबुली आरोपी पती संजय मोहिते याने पोलिसांना दिली आहे.
आरोपी संजय याला न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी दिली असून त्याच्या फरार असलेल्या साथीदाराचा शोध कोपरगाव पोलीस घेत आहेत. मृतदेह जळालेल्या अवस्थेत असतानाही पोलिसांनी अवघ्या तीन दिवसात खुनाचा उलगडा करत आरोपीला गजाआड केल्याने कोपरगाव शहर पोलिसांच्या कामाचे कौतुक होत आहे..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.