बीडमध्ये तरुणाची चाकूने वार हत्या
मध्यरात्री किरकोळ वादतून घडली घटना
चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं
अंबाजोगाईतील घाटनांदूरमध्ये घडली घटना
बीडमध्ये मध्यरात्री तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. २१ वर्षीय तरुणावर चाकूने सपासप वार करत जागीच संपवण्यात आले. अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे शनिवारी मध्यरात्री ही भयंकर घटना घडली आहे. किरकोळ वादातून तरुणाची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर तरुणाच्या नातेवाईकांनी अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी ठिया आंदोलन केले.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर उत्तरेश्वर वाकडे (२१ वर्षे) असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव होते. तो पट्टीवडगाव येथे कुटुंबीयांसोबत राहत होता. ज्ञानेश्वर वाकडे हा गेल्या एक वर्षापासून लातूरजवळील हायवेवर एका ठिकाणी आचारी म्हणून काम करत होता. शनिवारी रात्री ११:३० वाजताच्या सुमारास ज्ञानेश्वर हा अंबाजोगाईवरून घाटनांदूरच्या दिशेने त्याच्या स्वतःच्या दुचाकीवरून जात होता. यावेळी त्याच्यासोबत त्याचे इतर दोन मित्रही होते.
ते घाटनांदूर येथील साठे चौकात आले असता तिथे त्यांचा काही जणांसोबत वाद झाला. या वादविवादातून संशयित आरोपींनी तिक्ष्ण चाकूने ज्ञानेश्वरवर सपासप वार केले. हा हल्ला इतका भयंकर होता की, ज्ञानेश्वरचा जागीच मृत्यू झाला. हल्ला झाला त्यावेळी दुचाकीवर ज्ञानेश्वरसोबत असलेल्या दोन मित्रांपैकी एकाने प्रसंगावधान राखून घटनास्थळावरून पळ काढल्याने तो सुदैवाने बचावला. तर दुसरा मित्र या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे.
जखमी तरुणाला तातडीने उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मृत ज्ञानेश्वरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी याच रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. याप्रकरणाची अधिक माहिती घेण्यासाठी अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मुरलीधर खोकले यांच्याशी फोन वरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असताना त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.