सूरतमध्ये रविवारी रात्री धक्कादायक घटना घडली. बारावीत शिकणाऱ्या १९ वर्षीय मुलाने एका पोलीस कर्मचाऱ्याला कारच्या बोनेटवरून तब्बल ३०० मीटरपर्यंत फरफटत नेले. त्यानंतर कारच्या चाकाखाली चिरडण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर तरुणाने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. शहरात कायद्याचा धाक कुणाला आहे की नाही, असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित केला जात आहे.
काटरगाम पोलिसांचे एक पथक रविवारी रात्री अलकापुरी पुलाखाली वाहन तपासणीचे काम करत होते. त्याचवेळी लोकरक्षक गौतम जोशी यांना एक नंबरप्लेट नसलेली आणि काळी काच असलेली कार दिसली. त्यांनी ड्रायव्हरला थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कारचालक हेमराजने एक्सीलेटर दाबले आणि कार दामटवण्याचा प्रयत्न केला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
त्यावेळी जोशी यांनी स्वतःला वाचवण्यासाठी बोनेटवर उडी मारली. परंतु कारचालक तरुणाने कारचा वेग वाढवत पळ काढला. त्याने बॅरिकेडदेखील उडवले. त्याने पोलिसाला कारच्या बोनेटवरून जवळपास ३०० मीटरपर्यंत फरफटत नेले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
हेमराजने कार झिगझॅग चालवली. त्यानंतर जोशी हे खाली रस्त्यावर पडले. इतक्यावरच न थांबता तरुणाने त्यांना चाकाखाली चिरडण्याचाही प्रयत्न केला. त्यांनी स्वतःचा कसाबसा बचाव केला, असे एफ विभागाचे सहायक पोलीस आयुक्त एल बी झाला यांनी सांगितले.
कटरगाम पोलिसांनी कारचालक तरूण हेमराजला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरोधात खुनाचा प्रयत्न, रॅश ड्रायव्हिंग आणि मोटार वाहन कायद्याच्या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जोशी यांना कारच्या बोनेटवरून फरफटत घेऊन जाताना एका पोलीस कर्मचाऱ्याने पाठलाग केला. त्याच कर्मचाऱ्याने जोशींना रुग्णालयात नेले.
घटनास्थळावरून पसार झालेल्या तरुणाचा ठावठिकाणा तांत्रिक यंत्रणाच्या मदतीने शोधून पोलिसांनी त्याला काही तासांतच ताब्यात घेतले. तरुणाचे वडील बांधकाम क्षेत्रात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.