अभिनेता टायगर श्रॉफशी संबंधित गोळीबार प्रकरणाचा तपास सुरू
हरियाणामधून २२ वर्षीय सूनयना पंडितला अटक करण्यात आली
सूनयना ही कथित मुख्य सूत्रधार अनिल पंडितच्या भावाची पत्नी आहे.
मुंबईतील जुहू परिसरात प्रसिद्ध अभिनेत्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. या गोळीबार प्रकरणात हरियाणामधून एका २२ वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे. सूनयना पंडित असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. ही महिला या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार अनिल पंडितच्या भावाची पत्नी आहे. या गुन्ह्यात आर्थिक पुरवठा केल्याचा आरोप सूनयनावर आहे. या गुन्ह्यात अटक आरोपींची संख्या १३ झाली आहे. तर यात तीन महिला आरोपींचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास जुहू परिसरात दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी अभिनेता टायगर श्रॉफ याच्या कारवर गोळीबार केला होता. या गोळीबारात दोन जण जखमी झाले होते. तर अभिनेता टायगर श्रॉफ किरकोळ जखमी झाला होता. या घटनेप्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून या गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आलाय.
गुन्हे शाखेने याआधी राजस्थानमधील कोटा, दिल्ली तसेच हरियाणामधील सोनीपत येथून शूटर्ससह १२ आरोपींना गजाआड केले होते. यात शस्त्र पुरवठा केल्याप्रकरणी अटक आरोपीमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. त्यानंतर २७ ऑक्टोबर रोजी या गुन्ह्यात ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम’ (मकोका – MCOCA) अंतर्गत वाढीव कलमे लावण्यात आली आहेत.
या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार अनिल पंडित हा असून तो अमेरिकेत असल्याची माहिती समोर आलीय. लॉरेन्स बिष्णोई टोळीचा सराईत गुंड असणारा पंडित हा मूळचा हरियाणातील सोनिपतचा आहे. पंडितच्या इशाऱ्यावरून हा हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणाचा सखोल तपासात या संघटित टोळीच्या गुन्हेगारी कारवायांमध्ये हरियाणा येथील एका महिलेचाही थेट सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने हरियाणा पोलिसांच्या मदतीने कर्नाल जिल्ह्यात कारवाई करत १ नोव्हेंबर रोजी २२ वर्षीय महिला सूनयना पंडितला ताब्यात घेऊन अटक केलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.