ONORC मुळे पात्र लाभार्थ्यांना देशातील कोणत्याही भागातून हक्काचे रेशन घेण्याची सुविधा
मूळ गावापासून दूर रोजगारासाठी राहणाऱ्या स्थलांतरित कामगारांना याचा विशेष फायदा
नवीन ठिकाणी स्वतंत्र रेशन कार्ड काढण्याची गरज नाही
‘जिथे लाभार्थी, तिथे रेशन’ या संकल्पनेमुळे स्थलांतरित कुटुंबांसाठी अन्नसुरक्षेची सुविधा अधिक सुलभ
तुम्ही तुमच्या मूळ घरापासून किंवा गावापासून लांब राहताय आणि तुम्हाला सरकारकडून मिळणार रेशन कसं घेऊ हा प्रश्न पडला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी. पूर्वी नागरिकांना रेशन कार्डवर नमूद असलेल्या मूळ ठिकाणीच जाऊन रेशन घ्यावं लागत होतं. मात्र आता टेन्शन नाही कारण, वन नेशन वन रेशन कार्ड (ONORC) या सुविधेमुळे पात्र लाभार्थ्यांना देशाच्या कोणत्याही भागातून आपल्या हक्काचे रेशन घेता येते.
ONORC अंतर्गत लाभार्थ्यांना नवीन ठिकाणी स्वतंत्र रेशन कार्ड काढण्याची गरज नसते. त्यांचे रेशन कार्डच यासाठी पुरेसे ठरते. त्यामुळे एखादी व्यक्ती रोजगारासाठी आपल्या गावातून मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर किंवा देशातील अन्य कोणत्याही शहरात गेली असेल, तरी ती संबंधित ठिकाणी आपल्या पात्रतेनुसार रेशन घेऊ शकते. या सुविधेचा सर्वाधिक फायदा स्थलांतरित कामगार, मजूर, रोजंदारीवर काम करणारे नागरिक तसेच रोजगारासाठी सतत ठिकाण बदलणाऱ्या कुटुंबांना होतो.
पूर्वी रेशन मिळवण्यासाठी मूळ गावाशी जोडलेले राहणे आवश्यक असल्याने अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. आता मात्र ‘जिथे लाभार्थी, तिथे रेशन’ या संकल्पनेमुळे ही अडचण मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. विशेष म्हणजे, या व्यवस्थेमुळे लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या अन्नधान्यापासून वंचित राहण्याची शक्यता कमी होते.
कामाच्या ठिकाणीच रेशन उपलब्ध झाल्याने प्रवासाचा खर्च आणि वेळ दोन्ही वाचतात. त्यामुळे रोजगारासाठी स्थलांतर करणाऱ्या कुटुंबांसाठी ही सुविधा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. ONORC ही केवळ रेशनची सुविधा नसून, देशाच्या कोणत्याही भागात राहणाऱ्या पात्र नागरिकांना त्यांच्या अन्नसुरक्षेचा हक्क कायम ठेवण्यास मदत करणारी व्यवस्था आहे. त्यामुळे तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी रोजगारासाठी गावाबाहेर राहत असेल, तर मूळ गावात परत जाण्याची गरज नसून जवळच्या अधिकृत रास्त भाव दुकानातून पात्रतेनुसार रेशन घेता येऊ शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.