देशातील पहिल्या बुलेट ट्रेनची प्रतीक्षा आता लवकरच संपण्याची शक्यता आहे. भारतातील पहिली हायस्पीड रेल्वे सेवा २०२७ मध्ये सुरू होणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील सुरत ते वापी हा पहिला टप्पा प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. २०२७ च्या शेवटच्या तिमाहीत या मार्गावर बुलेट ट्रेन धावण्याचे नियोजन असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
मुंबई-अहमदाबाद हा ५०८ किलोमीटर लांबीचा महत्त्वाकांक्षी हायस्पीड रेल्वे प्रकल्प असून, तो महाराष्ट्र, गुजरात आणि दादरा-नगर हवेली या भागांतून जाणार आहे. या प्रकल्पाचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण केले जाणार आहे. सुरत-वापी मार्गावर सेवा सुरू झाल्यानंतर उर्वरित मार्गही टप्प्याटप्प्याने प्रवाशांसाठी खुला केला जाणार आहे.
या बुलेट ट्रेनचा कमाल वेग ताशी ३२० किलोमीटर असणार आहे. त्यामुळे मुंबई ते अहमदाबाद हे अंतर अवघ्या १ तास ५८ मिनिटांत पार करता येणार आहे. सध्या या प्रवासासाठी रस्तेमार्गाने साधारण आठ ते नऊ तास लागतात. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
रेल्वेमंत्र्यांच्या माहितीनुसार, सप्टेंबर २०२६ पर्यंत प्रकल्पातील ४५६ किलोमीटरचे पिअर बांधकाम आणि ३७१ किलोमीटरचे व्हायाडक्ट बांधकाम पूर्ण झाले आहे. तसेच २९९ किलोमीटरच्या मार्गावर सुमारे सहा लाख नॉइज बॅरिअर्स बसवण्यात आले आहेत.
या प्रकल्पासाठी भारतीय बनावटीच्या B28 हायस्पीड ट्रेनची निर्मितीही सुरू आहे. इंटिग्रल कोच फॅक्टरी आणि बीईएमएल यांच्या माध्यमातून ही ट्रेन विकसित केली जात आहे. तिची डिझाइन क्षमता ताशी २८० किलोमीटर आहे. २०२७ च्या मध्यापर्यंत तिच्या ट्रॅक चाचण्या अपेक्षित आहेत.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात १२ स्थानके असतील. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प हा देशातील पहिला हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प आहे. महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमध्ये पसरलेल्या या प्रकल्पाची एकूण लांबी ५०८ किमी आहे. या प्रकल्पात १२ स्थानके असतील. या स्थानकांमध्ये साबरमती, अहमदाबाद, आनंद, वडोदरा, भरूच, सुरत, बिलिमोरा, वापी, बोईसर, विरार, ठाणे आणि मुंबई यांचा समावेश आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.