कोरोना संकटकाळानंतर देशातील बेरोजगारीचं प्रमाण वाढलं होतं. अनेक कंपन्या तसेच उद्योगधंदे बंद पडल्याने अनेकांनी हातातील नोकऱ्या गमावल्या होत्या. मात्र, आता हळूहळू परिस्थिती पुन्हा पूर्वपदावर येत आहे. गेल्या वर्षभरात देशातील बेरोजगारीचा दर घटल्याचं एका सर्व्हेक्षणातून समोर आलं आहे.
नुकताच सांख्यिकी मंत्रालयाने एक लेबर फोर्स सर्व्हे केला आहे. यामध्ये भारतातील महिला तसेच पुरुषांच्या बेरोजगारीचं प्रमाण झपाट्याने कमी झालं आहे. गेल्यावर्षी जानेवारी ते मार्च २०२३ या कालावधीत भारतातील बेरोजगारीचा दर ६.८ टक्के इतका होता. त्यानंतर एप्रिल-जून २०२३ आणि जुलै-सप्टेंबर २०२३ या तिमाहीत तो ६.६ टक्क्यांवर आला.
ऑक्टोबर-डिसेंबर २०२३ मध्ये बेरोजगारीत किंचित वाढ झाली होती. आता चालू वर्षात जानेवारी-मार्च २०२४ या तिमाहीत बेरोजगारीचा दर पुन्हा घसरून ६.७ टक्क्यांवर आला आहे. यामध्ये शहरी भागातील महिलांचा बेरोजगारीचा दरही कमी झाला आहे. २०२३ मध्ये शहरी भागातील महिलांचा बेरोजगारीचा दर ९.२ टक्के इतका होता.
त्यानंतर जुलै-सप्टेंबर २०२३ मध्ये त्यात जवळपास ०.६ टक्क्यांची घट झाली. त्यामुळे ऑक्टोबर-डिसेंबर २०२३ मध्ये महिलांच्या बेरोजगारीचा दर ८.६ टक्के इतका झाला. आता चालू आर्थिक वर्षात त्यात आणखी घट झाली असून जानेवारी-मार्च २०२४ पर्यंत तो ८.५ टक्के इतका झाला आहे.
महिलांबरोबरच पुरुषांच्या बेरोजगारीच्या दरातही मोठी घट झाली आहे. पुरुष बेरोजगारीचा दर ऑक्टोबर-डिसेंबर २०२२ मध्ये ६.५ टक्के इतका होता. त्यानंतर ऑक्टोबर-डिसेंबर २०२३ मध्ये ५.८ टक्क्यांवर आला. आता चालू आर्थिक वर्षात जानेवारी-मार्च २०२४ या तिमाहीत पुरुषांचा बेरोजगारीचा दर सरासरी ६ टक्के इतका आहे.
डेटावरून असेही दिसून आले आहे की, चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहित शहरी भागात १५ वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील लोकांचा श्रमशक्तीचा सहभाग वाढला आहे. जानेवारी-मार्च २०२३ या तिमाहीत श्रमशक्तीचा सहभाग ४८.५ टक्के इतका होता.
एनएसएसओच्या मते, एप्रिल-जून २०२३ मध्ये तो ४८.८ टक्क्यांवर आला. जुलै-सप्टेंबर या तिमाहीत सुद्धा श्रमशक्तीचा सहभाग वाढून ४९.३ टक्के झाला. ऑक्टोबर-डिसेंबर २०२३ मध्ये यात फारसा बदल झालेला नव्हता. आता चालू आर्थिक वर्षात भारतात श्रमशक्तीचा सहभाग ५०.२ टक्के झाला आहे. येत्या काही महिन्यात दर आणखीच वाढणार असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.