कोरोना संकट काळात प्रत्येकाचे आर्थिक हाल झाले. कोरोनामुळे अनेकांचे व्यवसाय बंद पडले. तसेच कित्येक जणांच्या नोकऱ्या गेल्या. याशिवाय शिक्षणातही विद्यार्थ्यांचं नुकसान झालं. आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असून रोजगारात जवळपास ५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
२०२२-२३ या आर्थिक वर्षात भारतातील नोकरदारांची संख्या ५८० दशलक्ष इतकी झाली आहे. आरबीआयने KLEMS डेटाचे विश्लेषण केल्यानंतर ही आकडेवारी समोर आली आहे. KLEMS डेटानुसार, गेल्या काही वर्षांत नोकऱ्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
त्यामुळे ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर २.४ टक्क्यांनी कमी झाला आहे. याच कालावधीत शहरी भागातील बेरोजगारी देखील ५.४ टक्क्यांवर आली आहे. डेटावरून असेही दिसून आले आहे, की गेल्या ६ वर्षांत महिला आणि तरुणांच्या रोजगाराचे प्रमाणही वाढले आहे.
वाढलेला रोजगारामध्ये २३७ दशलक्ष कृषी, ६८ दशलक्ष बांधकाम आणि ६३ दशलक्ष उद्योग क्षेत्रातील आहेत. याशिवाय पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्मितीमधील उद्योगात आणि प्लास्टिक उद्योगातील रोजगारामध्येही कमालीची वाढ झाली आहे. प्लास्टिक उद्योगाने १.३२ दशलक्ष नोकऱ्या निर्माण केल्या आहेत.
गेल्या सहा वर्षातील डेटा दर्शवतो की, २०१७-१८ मध्ये देशातील रोजगार ४६.८ इतका होता. तो २०२२-२३ मध्ये ५६ टक्के इतका वाढला आहे. त्याचप्रमाणे, श्रमशक्तीचा सहभाग देखील ५७.९ टक्के झाला आहे. यामुळे २०१७-१८ मध्ये असलेला बेरोजगारीचा दर ६ टक्क्यांवरून थेट ३.२ टक्क्यांवर आला आहे.
डेटावरून असेही दिसून आले आहे, की गेल्या ६ वर्षांत सुशिक्षित व्यक्तींच्या रोजगारात लक्षणीय वाढ झाली आहे. पदवीधरांसाठी रोजगार क्षमता २०१७-१८ मधील ४९.७ टक्क्यांवरून २०२२-२३ मध्ये ५५.८ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. पदव्युत्तर आणि त्यावरील रोजगार दर ६७.८ टक्क्यांवरून ७०.८ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
एकंदरीत आरबीआयच्या डेटाबेसवरून असं दिसून येतंय की, कोरोना संकटानंतर भारतातील बेरोजगारी झपाट्याने कमी झाली आहे. याशिवाय नोकऱ्यांमधील प्रमाणही वाढलं आहे. सुशिक्षित बेरोजगार तरुण तसेच महिलांचा आकडा देखील घटला आहे. येत्या काही दिवसांत रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होऊन हा आकडा खाली येईल, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.