नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता पीएफचे पैसे काढण्यासाठी क्लेमची लांबलचक प्रोसेस करावी लागण्याची शक्यता कमी होणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आपल्या कोट्यवधि सदस्यांसाठी UPI द्वारे PF चे पैसे काढण्याची नवीन सुविधा सुरू करण्याच्या तयारीत आहे. मिडिया रिपोर्टनुसार, ही सुविधा डिसेंबर २०२६ अखेरपर्यंत सुरू होऊ शकते. त्यामुळे गरजेच्या वेळी कर्मचाऱ्यांना पीएफ मधले पैसे मिळवणं जास्त सोपं होणार आहे.
नवीन सुविधेनुसार, कर्मचाऱ्यांचा UAN म्हणजेच युनिव्हर्सल अकाउंट नंबर त्यांच्या UPI खात्याशी लिंक केला जाणार आहे. त्यानंतर सदस्यांना BHIM अॅपच्या माध्यमातून पीएफ खात्यातली शिल्लक तपासता येईल. तसेच किती पैसे काढता येतील आणि किती रक्कम खात्यात ठेवणं गरजेचं आहे, याचीही माहिती मिळू शकेल. त्यामुळे पीएफ बॅलन्स तपासण्यासाठी सतत EPFO पोर्टलवर जाण्याची गरज कमी होईल. सोबत पैसे काढण्याची प्रोसेस जास्त सोपी होण्याची अपेक्षा आहे.
EPFO च्या नव्या सुविधेतला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे PF मधून पैसे काढण्याची मर्यादा. मिडिया रिपोर्टनुसार सुरूवातीला पात्र PF शिल्लक रकमेपैकी ७५ टक्क्यांपर्यंत पैसे काढता येऊ शकतात.
मात्र १९ नोव्हेंबर रोजी झालेल्या EPFO बोर्डाच्या बैठकीत खात्यात किमान २५ टक्क्यांऐवजी १० टक्के रक्कम ठेवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याची माहिती आहे. हा बदल लागू झाल्याने कर्मचाऱ्यांना पात्र रकमेपैकी ९० टक्क्यांपर्यंत पैसे काढण्याची संधी मिळू शकते. पण अजून याबद्दल अंतिम अधिकृत नियम आणि निकासी मर्यादा जाहीर केली नाही.
UPI ने PF काढण्याची सुविधा ही EPFO 3.0 या मोठ्या डिजिटल बदलाचा भाग आहे. याने पीएफ संबंधित सेवा जलद आणि एकदम सोप्या करण्याचा प्रयत्न केला जातोय. कागदपत्रांची प्रोसेस कमी करणं, क्लेम लवकर काढणं आणि डिजिटल सुविधांचा विस्तार करणं हा यामागचा उद्देश आहे.
नवीन सुविधा सुरू झाल्यावर आपत्कालीन परिस्थितीत कर्मचाऱ्यांना PF मधले पैसे मिळवणं सोपं होऊ शकतं. पण सुविधेची अधिकृत लॉन्च तारीख आणि पैसे काढण्याची अंतिम मर्यादा जाहीर झाल्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.