Surabhi Jayashree Jagdish
भारतात दर महिन्याला लाखो स्कुटींची विक्री होते. यामध्ये स्कुटी खरेदी करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. अनेक जण रोजच्या कामासाठी आणि प्रवासासाठी स्कुटीचा वापर करतात. त्यामुळे स्कुटीची योग्य काळजी न घेतल्यास तिच्या इंजिनमध्ये बिघाड होऊ शकतो.
स्कुटी चालवताना इंजिनमधून नेहमीपेक्षा जास्त आवाज येत असेल, तर इंजिन ऑईलची तपासणी केली पाहिजे. इंजिन ऑईल योग्य स्थितीत असल्यास इंजिनचे आतील भाग व्यवस्थित काम करण्यास मदत होते. मात्र ऑईल खराब झालं किंवा त्याची कमी झालं तर इंजिनचा आवाज वाढू शकतो.
स्कुटी चालवताना इंजिन नेहमीपेक्षा जास्त गरम होत असेल, तर इंजिन ऑईलची तपासणी करा. ऑईल खराब झालं असेल किंवा त्याची पातळी कमी झाली असेल, तर इंजिनला योग्य वंगण मिळण्यात अडचण येऊ शकते.
प्रत्येक स्कुटीसोबत कंपनीकडून मॅन्युअल बुक किंवा ई-मॅन्युअल दिलं जातं. यामध्ये स्कुटीसाठी कोणत्या प्रकारचं इंजिन ऑईल वापरावं, याची माहिती दिलेली असते. त्याचप्रमाणे किती किलोमीटरनंतर किंवा किती महिन्यांनी इंजिन ऑईल बदलायचं, हेही सांगितलेलं असतं.
स्कुटीमध्ये वापरल्या जाणाऱ्या इंजिन ऑईलच्या प्रकारानुसार ते बदलण्याचा कालावधी वेगळा असतो. मिनरल ऑईल साधारणपणे 2,500 ते 4,000 किलोमीटरनंतर तर सिंथेटिक ऑईल 5,000 ते 6,000 किलोमीटरनंतर बदललं जातं. पण जर तुम्ही रोज ट्रॅफिकमध्ये स्कुटी चालवत असाल किंवा 3 ते 4 महिन्यांत फक्त 1,500 ते 2,000 किलोमीटर प्रवास करत असाल तर कंपनीच्या सूचनेनुसार लवकर ऑईल बदलण्याची गरज असू शकते.
तुम्ही स्कुटीचा वापर कमी करत असाल तरी इंजिन ऑईल बदलण्याकडे दुर्लक्ष करू नका. इंजिन ऑईल किती किलोमीटरनंतर बदलायचं, याची माहिती कंपनी देते. त्यामुळे स्कुटी किती चालवली जाते, यासोबतच ऑईल बदलण्याचा कालावधीही लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
काही जण स्कुटीचा वापर फक्त गरज असेल तेव्हाच करतात. अशा वेळी स्कुटी कमी चालत असली, तरी इंजिन ऑईल बदलण्याचा ठरलेला कालावधी पाळणं आवश्यक आहे. कंपनीच्या सूचनांनुसार स्कुटीचा वापर कमी असल्यास साधारण सहा महिन्यांनी इंजिन ऑईल बदलता येतं.